जयसिंगपूर : बांधकाम परवान्याबाबत ग्रामपंचायतीचे कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने नागरिकांनी परवानगी कोणाकडे घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सुमारे ३२०० चौरस फुटाच्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी लागणार नाही, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. मात्र, त्याबाबत ग्रामपंचायत पातळीवर कोणतेही आदेश नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्यात ५२ ग्रामपंचायती आहेत. बांधकामासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करावा लागतो. हा प्रस्ताव पंचायत समितीकडून उपविभागीय अधिकारी कार्यालय, त्यानंतर नगररचनाकार विभागाकडे जातो. शासकीय काम सहा महिने थांब, अशी अवस्था नागरिकांची होते. अनेकवेळा शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. शेतीप्रधान तालुका असल्यामुळे त्यातून वेळ काढून बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना कार्यालयाकडे जावे लागते. वेळेत परवाने मिळत नसल्याने अनेकवेळा मनस्ताप सहन करावा लागतो.
दरम्यान, ग्रामविकास विभागाने ३२०० चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावर बांधकाम करण्याकरिता नगररचनाकार विभागाची परवानगी शिथिल केली आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायत पातळीवर कोणतेही आदेश नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनासमोर देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे परवान्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
-----------------
कोट - बांधकाम परवान्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे परवान्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे.
- शंकर कवितके, गटविकास अधिकारी