कोल्हापूर : जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील गटबाजीने पक्ष, कार्यकर्त्यांबरोबरच नेत्यांचेही मोठे नुकसान झाले. एकेकाळी राज्यात सर्वाधिक बळकट असणाऱ्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही, याची लाज वाटते. त्यामुळेच गटबाजीला मूठमाती देत पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस एकसंध करणार असल्याची घोषणा माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी केली. आता पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांच्यासोबत असलेले भांडण संपले असून कॉँग्रेस बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊ, कोण येणार नसेल तर त्यांना गुंडाळून घेऊन विजयाचा फज्जा गाठायचा, असा निर्धार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केला.
कॉँग्रेस कमिटीत बांधण्यात येणाºया सभागृहाचे भूमिपूजन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी आवळे व आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.ट्रस्टचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ट्रस्टकडे एक कोटी निधी शिल्लक असून येथे अद्ययावत सभागृह उभे होणार आहे. कॉँग्रेस भवनाच्या रस्त्यालगतच्या इमारतीतील तळमजल्यावरील गाळेधारकांकडून अनेक वर्षे भाडे मिळत नाही, याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहे.पी. एन. पाटील म्हणाले, आता सांगाडा उभा असलेल्या जागी दुमजली इमारतीचा आराखडा तयार केला होता; पण त्याला मूर्तस्वरूप आले नाही. सत्ता आल्यानंतर भाजपने प्रत्येक शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून कार्यालये बांधण्याचा धडाका लावला आहे; मात्र काँग्रेसने सत्ता काळात सामान्य लोकांची कुटुंबे उभी केली. नव्या सभागृहामुळे काँग्रेसला संजीवनी मिळणार आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांना याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत.जयवंतराव आवळे म्हणाले, काँग्रेसचे अनेक जिल्हाध्यक्ष झाले; पण सभागृह उभारण्याचे धाडस मात्र कल्लाप्पाण्णा आवाडे करत आहेत. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतरही काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले; पण ताकद असूनही आता विधानसभेत एकही प्रतिनिधी पोहोचू शकला नाही, याची लाज वाटते. काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन गटबाजी संपवणार असल्याचे मी त्यांना सांगितले आहे.प्रकाश आवाडे म्हणाले, जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला राहिल्याने मतभेद वाढत संघर्ष विकोपाला गेला. परिणामी, पक्ष, कार्यकर्ते, पर्यायाने नेत्यांचेही नुकसान झाले. याचे आत्मचिंतन करून दुरुस्ती करायची की नाही. औपचारिकता म्हणून भेट पडली तर एकमेकांशी बोलत होतो. हे कोठे तरी थांबविले नाही, तर कार्यकर्ते माफ करणार नाहीत. आता एकसंधपणे कॉँग्रेस बळकट करूया.शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. पी. एन. पाटील, आवाडे, आवळे हे एकत्र आल्याचा आनंद असून गटबाजी संपल्याचे जाहीर केले.स्वागत प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी केले. तौफिक मुल्लाणी यांनी आभार मानले. महापौर शोभा बोंद्रे, बाळासाहेब सरनाईक, नामदेवराव कांबळे, राहुल आवाडे, राहुल खंजिरे, विलास गाताडे, उपस्थित होते.आवाडे दादा हात लावतील तिथे सोनेकल्लाप्पाण्णा आवाडे यांनी चालविलेल्या संस्थांचे कौतुक करत जयवंतराव आवळे म्हणाले, आवाडेदादा ज्या कामाला हात लावतात त्याचे सोने होते. बाबासाहेब खंजिरे, दत्ताजीराव कदम व आवाडेदादांनी इचलकरंजी बरोबरच जिल्ह्यातील कॉँग्रेस बळकट केली. इचलकरंजीतील कॉँग्रेसचे कार्यालय त्यांच्यामुळेच सुस्थितीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले....तर जि.प.त सत्ता असतीआता समेट झाला तसा वर्षापूर्वी झाला असता तर जिल्हा परिषदेमध्ये कॉँग्रेस सत्ता असती. ‘ताराराणी’ आघाडी का करावी लागली, हे आवळेसाहेबांना माहिती आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीपासून पी. एन. पाटील आणि आमच्यात वाद आहे, पण मनापासून सांगतो आता आमचे भांडण संपले. सांगली महापालिका सभेत तसे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सांगितल्याने चव्हाण यांनी समाधान व्यक्त केल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.नेत्यांचा विश्वास, कार्यकर्त्यांचा जल्लोषसमारंभाच्या शेवटी नेत्यांनी अंतर्गत संघर्षाला मूठमाती दिल्याची घोषणा करत हात वर करून कार्यकर्त्यांना विश्वास दिला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला.काँग्रेसचा ट्रस्टदिवंगत नेते एस.आर.पाटील यांच्या काळात काँग्रेस पक्षाच्यावतीने दैनंदिन खर्च व जिल्हा कार्यालयाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली आहे. श्री.पाटील असेपर्यंत त्याचे काम रयत संघातून चालत होते. त्यांच्या निधनानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे हे अध्यक्ष झाले. त्या ट्रस्टकडे असलेल्या निधीतूनच पक्षासाठी सभागृहाचे बांधकाम होत आहे.कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या दारात होत असलेल्या सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी झाला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेत्यांनी अशी एकीची मूठ आवळली. यावेळी दिलीप पोवार, बाळासाहेब सरनाईक, महापौर शोभा बोंद्रे, प्रल्हाद चव्हाण, राहुल आवाडे, जयवंतराव आवळे, कल्लाप्पाण्णा आवाडे, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, प्रकाश सातपुते आणि तौफिक मुजावर, आदी उपस्थित होते.