कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर रविवारी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. विजय खेचून आणलात. पक्षासह आम्हाला नवी ऊर्जा दिलात, अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या गर्दीने कॉंग्रेस कमिटी फुलली.प्रा. जयंत आसगावकर यांना शिक्षक मतदारसंघातील कॉंग्रेसची उमेदवारी देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत पालकमंत्री पाटील यांनी मोठी भूमिका निभावली. विधान परिषदेतील या विजयाबद्दल कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, करवीर, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, चंदगड, आजरा, आदी तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून पालकमंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शब्द खरा करून दाखविलात. आपल्यामुळे जिल्ह्याला पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघातील आमदारकी मिळाली, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, ॲड. गुलाबराव घोरपडे, आनंद माने, सचिन चव्हाण, संध्या घोटणे, प्रमोद बुलबुले, किरण मेथे, राहुल खंजिरे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समिती, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, आदी, विविध संघटनांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवदने दिली.शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे पाठपुरावाकोल्हापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री पाटील यांना दिले. जाचक अटी असलेल्या संच मान्यतेचे परिपत्रक रद्द करावे. शाळा तेथे शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करावी, आदी मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
या मागण्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करण्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, रणजित पाटील, समवेल सौंदडे, ऋषिकेश पाटील, प्रशांत मोटे, आदी उपस्थित होते.महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनकॉंग्रेस कमिटीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.