कोल्हापूर : शहरातील नागरिकांसाठीची थेट पाइपलाइन योजना पूर्ण झाल्यानंतर आम्ही ‘त्यांचे’ अभिनंदनच करू, अशी जाहीर भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. सतेज पाटील यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.खासदार महाडिक म्हणाले, आम्हांला लोकांनी केवळ टीका करण्यासाठी निवडून दिलेले नाही. त्यामुळे जे कोणी चांगले काम करतील त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. शहरवासीयांची स्वच्छ पाण्याची गरज थेट पाइपलाइन योजनेतून पूर्ण होणार आहे. एकदा ती पूर्ण झाल्यानंतर तिला किती वर्षे लागली, का विलंब झाला यावर चर्चा करणे योग्य नाही. ती कधी पूर्ण हाेईल माहिती नाही; पण झाल्यावर आम्ही अभिनंदन करू.महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस आणणार आहे. त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. शरद पवार हे महायुतीसोबत येण्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता याबाबत आपल्याला ही माहिती नाही; परंतु ते ऊर्जावान नेते आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. ते आमच्यासोबत आले तर पक्षाला आनंदच होईल.
आता तुम्ही प्रश्न विचारू नका...भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांविषयी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता खासदार महाडिक म्हणाले, त्यांनीच खुलासा केल्यानंतर आता तुम्हीही ते कोल्हापूरला आल्यानंतर हा प्रश्न विचारू नये अशी विनंती आहे. चाय पे चर्चा हा भाजपचा देशभरातील उपक्रम आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला.एकत्र कशाला यायला पाहिजे?तुम्ही सतेज पाटील यांचे अभिनंदन करणार असाल तर भविष्यात कोल्हापूरच्या विकासासाठी तुम्ही दोघे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘एकत्रच कशाला यायला पाहिजे? त्यांचे चालू द्या, आमचं चाललंय तेही चालू द्या,’ असे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.