कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारपासून प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे यांनी ‘चंदगड’मधून पक्षाकडे मागणी केली आहे. शनिवार (दि. १०)पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र बऱ्यापैकी निश्चित झाले असून, काही जागांबाबत वाटाघाटी सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये दिल्लीत चर्चा सुरू असली तरी प्रदेश काँग्रेसकडून इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवारपर्यंत अर्ज देता येणार आहेत. आज, गुरुवारपासून काँग्रेस कमिटीत इच्छुकांची गर्दी वाढणार असून, ‘कोल्हापूर उत्तर’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’, ‘इचलकरंजी’ येथे इच्छुकांची संख्या अधिक राहणार आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप, त्यातून काँग्रेसला मिळणाऱ्या जागा व इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी निश्चित करताना नेतृत्वाचा कस लागणार, हे निश्चित आहे.
काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांकडून अर्ज, कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी एकच अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:15 PM