‘कोल्हापूर उत्तर’मध्ये विश्वास, पारदर्शकतेवर विजयाचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:56 PM2024-10-28T12:56:57+5:302024-10-28T12:57:39+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारी यावरच बरीच खलबतं झाली. इच्छुक कमालीचे तणावाखाली ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारी यावरच बरीच खलबतं झाली. इच्छुक कमालीचे तणावाखाली होते, तर अनेकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या होत्या. अखेरीस रविवारी रात्री ही कोंडी फुटली. जागा एक आणि इच्छुक अनेक असले की नाराजीचा तसेच बंडखोरीचा धोका जास्त असतो. कधी सुप्त बंडखोरी असते तर कधी उघड असते. त्यामुळे दोन्हीकडील उमेदवारांना आधी कार्यकर्ते-नेत्यांच्या ‘प्रामाणिकपणा’च्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कोल्हापूरची जागा कोणत्या घटक पक्षाला सुटणार यावर, आधी बरीच ताणाताणी झाली. भाजप-शिंदेसेनेत तसेच काँग्रेस-उद्धवसेनेत जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच त्यांच्यातील उमेदवारही मोठ्या ताकदीने प्रयत्नशील होते. भाजपकडून सत्यजित कदम यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत जोरदार ताकद लावली. खासदारपुत्र कृष्णराज महाडिक यांनीही मध्येच घोडे रेमटून आपल्याला काही संधी मिळते का पाहिले. या दोघांच्या उमेदवारीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत चर्चा गेली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी शेवटपर्यंत आग्रह सोडला नाही. त्यांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच ताकद असल्याने ही जागा आणि उमेदवारीदेखील क्षीरसागर यांच्या गळ्यात पडली.
ज्यापद्धतीने महायुतीमध्ये ताणाताणी झाली तशीच ती काँग्रेस-उद्धवसेनेतही झाली. उद्धवसेनेकडून संजय पवार प्रमुख दावेदार होते, तर काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव, राजेश लाटकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह आठ जण इच्छुक होते. ही जागा आमदार सतेज पाटील यांनी पदरात पाडून घेतली; पण उमेदवारी कोणाला द्यायची यावर मात्र बरीच कसरत करावी लागली. सगळीकडे विद्यमान आमदारांना प्राधान्य दिले जात असताना जयश्री जाधव यांना डावलून राजेश लाटकर यांना उमेदवारी देणे कितपत फायद्याचे होते, हे मतदान यंत्रे उघडल्यावरच कळणार आहे.
या मतदारसंघात बंडखोरी केली जाणार नाही, याची खबरदारी दोन्ही आघाड्यांत घेतली जाईल. नेतेमंडळी पॅचअप करतील; पण सुप्त बंडखोरी कशी रोखायची, हा प्रश्न दोन्ही आघाड्यांत सतावत राहील. अनेकांना वाटत होते, आता आपणाला संधी आहे; पण तिकीटच मिळाले नसल्याने ही संधी वाया गेल्याची रुखरुख कायम मनात बोचत राहणार आहे. त्यामुळे महायुती-महाविकास आघाडीला विजय मिळविण्याआधी इच्छुक, नेते यांच्या ‘प्रामाणिकपणा’शी सामना करावा लागणार आहे. शिंदेसेना आणि काँग्रेस यापैकी कोण सर्वांधिक विश्वासाचे, सौहार्दाचे, पारदर्शक वातावरण निर्माण करील, तोच जिंकणार आहे.
तरुण कार्यकर्ता म्हणून राजेश लाटकरना उमेदवारी - सतेज पाटील
सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी कधी मिळणार, हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो. यंदा आम्ही पहिल्यांदा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजेश लाटकर यांच्यासारख्या महापालिकेत काम केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिले.
कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. आमदार जयश्री जाधव यांनीदेखील आपलं मोठं मन दाखवत आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असे सांगितले. यामुळे एक तरुण कार्यकर्ता म्हणून लाटकर यांची निवड केली, असे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धवसेना आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊन आमचा स्ट्राइक रेट जास्तीत जास्त कसा असेल, हे पाहणार आहोत. जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार उद्या, मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
क्षीरसागरांनी स्वतःच्या पक्षात लोक काय करत आहेत याचा विचार करावा
आमदार जयश्री जाधव यांचे तिकीट कापून एका स्त्रीचा अपमान केल्याची टीका राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. याला आमदार पाटील प्रत्युत्तर देताना म्हणाले, सुजय विखेंच्या कार्यक्रमात जयश्रीताईंबद्दल काय बोललं गेलं हे आधी क्षीरसागर यांनी एकदा ऐकावं. त्यांच्या स्वतःच्या पक्षात लोक काय करत आहेत, याचा त्यांनी विचार करायला हवा.
गनिमी काव्याने भाजपचा कार्यक्रम करणार
देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही असेल, कारण गेली अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली, मेट्रोची संकल्पना काँग्रेसचे सरकार असताना आणली गेली. आता ते उद्घाटन करत आहेत. सगळ्याची सुरूवात काँग्रेसच्या काळात झाली आहे, असे सतेज पाटील म्हणाले. महाराष्ट्राची जनताच आता गनिमी काव्याने भाजपचा कार्यक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.