कोल्हापूर : फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधील ६५० मते दुसऱ्या प्रभागात घुसवली असून दक्षिण मतदार संघातील मते इकडे नोंद केली आहेत. शिवसेनेचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र सत्तेत असणारी काँग्रेस करत आहे. महापालिका निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेकडून करण्यात येणारी विकासकामे, तगड्या उमेदवारांचा पक्षातून उमेदवारी मागणीच वाढता कल, मंत्र्यांवर यापूर्वी केलेला आरोप यामुळेच काँग्रेसकडून अशा प्रकारचे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.इंगवले म्हणाले, महापालिकेने जाहिर केलेल्या प्रारुप मतदार यादीतील गैरकारभार समोर आला आहे. यामध्ये फिरंगाईमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. ६५० पेक्षा जास्त हक्काची मते तटाकडील तालीम प्रभाग क्रमांक ४८ मध्ये गेली आहेत. तसेच फिरंगाई प्रभागात मिराबाग, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा, शाहू कॉलनी, वेताळ तालीम, खंडोबा तालीम येथील मतदारांचा समावेश केला आहे.
असाच प्रकार सर्वच प्रभागात झाला आहे. ताबडतोब पूर्वीप्रमाणे मतदार यादी करावी अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू. तीव्र आंदोलन करु. पत्रकार परिषदेला आबा जगदाळे, राजू घोरपडे, तात्या साळोखे, सुकूमार लाड, जीवन घोरपडे आदी उपस्थित होते.कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरुन घोळफिरंगाई प्रभागात १२०० पेक्षा जास्त मतांचा घोळ झाला आहे. महापालिकेतील अधिकाय्रांनी कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरुन हे षडयंत्र केले याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही इंगवले यांनी केली. मंत्र्यानेही संबंधित अधिकाय्रांना पूर्वीप्रमाणे यादी करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा इंगवले यांनी दिला.