कोल्हापूरची जागा कॉग्रेसलाच मिळण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील
By राजाराम लोंढे | Published: February 3, 2024 08:20 PM2024-02-03T20:20:24+5:302024-02-03T20:21:05+5:30
शनिवार पर्यंत जागा वाटपावर शिक्कामाेर्तब
राजाराम लोंढे, काेल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कॉग्रेस पक्षाचे तीन विधानसभेचे आमदार असल्याने येथे आमची ताकद आहे. त्यामुळे माझ्यासह आमदार पी. एन. पाटील यांनी ही जागा कॉग्रेसला मिळावी, असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले. साधारणता शनिवार पर्यंत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल, त्यानंतर कळेल ही जागा कोणाकडे आहे, असे सूचक वक्तव्य कॉग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.
आमदार पाटील म्हणाले, महायुतीमध्ये अद्याप जागांबाबत चर्चाच नाही. भाजप ३० जागा लढविणार आहे का? शिंदे गट, राष्ट्रवादी कॉग्रेसला जागा मिळणार का? याबाबत काहीच हालचाली नाहीत. महाविकास आघाडीमध्ये किमान चर्चा तरी सुरु आहे. आमच्या दिल्ली व मुंबई स्तरावर बैठका झाल्या आहेत. तिन्ही पक्षांचे नेते दिवस दिवसभर बसून जागा वाटपाचा तिढा सोडवत आहेत. शनिवार पर्यंत अंतिम निर्णय होईल.
कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) व शिवसेनेने (उबाठा) दावा करणे चुकीचे नाही. मात्र, आमचे तीन आमदार असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. कॉग्रेसला जागा मिळाली तर येथून चांगला व ताकदवान उमेदवार देऊ. जागेच्या मागणीवरुन आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, तिन्ही पक्ष एकसंध असून आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.