लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण जगाला समतेचा, मानवतेचा संदेश दिला. हाच संदेश काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून साऱ्या देशभर देत आहेत. त्यामुळे ही यात्रा म्हणजे शाहूंच्या विचारांचाच जागर असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी शनिवारी येथे केले. काँग्रेसच्या वतीने दसरा चौकात भारत जोडो यात्रेनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील होते. मेळाव्यास कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यांच्यातील उत्साह ओसंडून वाहत होता.
दिग्विजय सिंह म्हणाले, "देशातील जनता काँग्रेसपासून दूर का जात आहे, याचे चिंतन उदयपूरच्या शिबिरात झाले. काँग्रेस नेत्यांचा समाजात संपर्क नसल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा निर्धार केला. राहुल गांधी ही यात्रा करतील असे कोणालाच वाटच नव्हते. मात्र, त्यांनी कृतीतून विरोधकांना उत्तर दिले. विरोधकांनी सातत्याने राहुल गांधी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम केले. धर्माच्या नावाखाली देशाचे तुकडे करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान धोक्यात आणण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. विविधतेमध्ये एकता आहे, तीच एकता देशाला यातून बाहेर काढेल. राहुल गांधी यांचा संदेश कोल्हापुरातील घराघरात पोहोचवण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे."
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले, "देश एका विचित्र परिस्थितीतून जात असून, देशाला वाचवण्याबरोबरच जोडण्याचे काम भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी करीत आहेत. नरेंद्र मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत असून लोकांना खोटी आश्वासने देऊन भूलभुलय्या केला. आठ वर्षांत आठ कोटींपेक्षा अधिक उद्योग संपले, बेकारी वाढली, खोटे बोल, पण रेटून बाेलण्याचे काम ते करीत आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यात्रेतील समतेचा संदेश देशात परिवर्तन करेल." तर, मेळाव्याचे संयोजक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले की, भाजपने देशात द्वेषाचे राजकारण सुरू केले असून, समाजासमाजात दुफळी माजवून राजकीय पोळी भाजत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा तेरा व्हॅनच्या माध्यमातून घराघरात पोहोचवली जाणार आहे. आमदार पी. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
‘सतेज’ यांचे कौतुक
राहुल गांधी यांची यात्रा खेडोपाडी पोहोचवण्याचे मोठे काम आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. त्यांचे काम काँग्रेस पक्षाला आदर्शवत असून, त्याचे अनुकरण देशभर केले जाईल, अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले. सर्वच नेत्यांनी एलईडी व्हॅन उपक्रमाचे व सतेज यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते जाणार
राहुल गांधी यांची यात्रा ५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येत असून, त्यामध्ये कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. दसरा चौकातील मैदान भरून शाहू महाराज पुतळ्यापर्यंत कार्यकर्ते उभे होते. कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहावयास मिळाला. घोषणांनी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली.