तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:50 PM2021-10-24T17:50:04+5:302021-10-24T17:55:04+5:30
केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पध्दतीने वापर करून राज्यात छापे टाकले जात आहेत. केवळ दहशतीसाठी वापर केला जात असल्याने यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.
कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पध्दतीने वापर करून राज्यात छापे टाकले जात आहेत. यात खरोखरच जे दोषी असतील त्यांना न्याय व्यवस्था शिक्षा देईलच, पण केवळ दहशतीसाठी वापर केला जात असल्याने यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. तसेच, तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र सुरु आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना लसीकरणाच्या सरकारच्या इव्हेंट्सवरही निशाणा साधला, ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लसीकणाच्या प्रत्येक टप्यांचे इव्हेंट (उत्सव) करणे सुरू आहे. शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा डांगोरा ते पिटत असले तरी प्रत्येक्षात देशात २१ टक्केच लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन डोस घेेतलेले ३० कोटी म्हणजे २१ टक्के लाेक आहेत. उर्वरित ४० कोटी जनतेला एकच डोस मिळाला आहे. चीनने सुमारे ११० कोटी नागरिकांना दोन्ही डोस दिले आहेत. अमेरिका, इंग्लड, रशिया, इस्रायल या देशांत लसीचा बुस्टर डोसची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात १८ वर्षाच्या पुढील नागरिक व बालकांना लस देण्यासाठी अजून १३० कोटी डोसची गरज असून त्यासाठी पुढचे वर्ष जाणार आहे. मग हे अवडंबर कशासाठी?
जगात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाचा लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो नाही, मग नरेंद्र मोदींचा का? बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक भूकबळी आहेत. सोया केक आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले. शेतकरी विरोधी भूमिका घेऊन दहशत माजवण्याचे काम सुरू आहे.