राहुल गांधींनी कोल्हापुरातील उचगावात दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत: बनवल्या भाज्या

By उद्धव गोडसे | Published: October 5, 2024 02:03 PM2024-10-05T14:03:26+5:302024-10-05T14:04:17+5:30

अजयकुमार सनदे यांच्या घरात स्वत: बनवल्या भाज्या, ऐनवेळच्या बदलाने पोलिसांची तारांबळ

Congress leader Rahul Gandhi dined at the home of a Dalit family in Uchgaon in Kolhapur Homemade vegetables | राहुल गांधींनी कोल्हापुरातील उचगावात दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत: बनवल्या भाज्या

राहुल गांधींनी कोल्हापुरातील उचगावात दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत: बनवल्या भाज्या

मोहन सातपुते

उचगाव : विमानतळावर उतरताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाहनांचा ताफा टेंबलाई टेकडीमार्गे उचगावच्या दिशेने गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणारे टेम्पोचालक अजयकुमार सनदे यांच्या घरी जाऊन गांधी यांनी स्वत: भाज्या बनवत सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यानिमित्ताने गांधी परिवाराचा दलित कुटुंबीयांशी असलेला स्नेह पुन्हा एकदा समोर आला. मात्र, ऐनवेळी घडलेल्या या प्रकाराने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली.

कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि काँग्रेसच्या संविधान संमेलनाच्या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. शहराच्या दिशेने येताना टेंबलाईवाडी उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनांचा ताफा टेंबलाई टेकडीमार्गे उचगावच्या दिशेला गेला.

उचगावातील टेम्पोचालक अजयकुमार सनदे यांच्या छोट्याशा कौलारू घरासमोर ताफा थांबताच स्थानिकांच्या भुवया उंचावल्या. ऐनवेळी घडलेल्या या बदलामुळे पोलिसही चक्रावले. मात्र, कारमधून उतरलेले राहुल गांधी थेट सनदे यांच्या घरात जाऊन संवाद साधू लागले. त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन सनदे कुटुंबाशी गप्पा मारत हरभरा आणि कांद्याची भाजी तयार केली. अंजना सनदे यांनी भाकरी केल्या. त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधी यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. सुमारे ४० मिनिटांनंतर गांधी यांच्या वाहनांचा ताफा उचगावातून बाहेर पडला.

आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी उचगावमधील भेटीचे नियोजन केल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. राहुल गांधी स्वत: भाज्या तयार करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू छत्रपती, आमदार बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम, आदी नेते बाजूच्या घरात थांबले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नीता हावळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल वळकुंजे, गणेश भोसले, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सनदे कुुटुंबीय भारावले

राहुल गांधी यांच्या अनपेक्षित भेटीने आम्ही भारावून गेलो. त्यांनी स्वत: भाज्या तयार करून आमच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. आम्हाला त्यांच्या हातच्या भाज्या खाण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि संविधानाबद्दल आमच्याशी चर्चा केली. हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय आहे. - अजयकुमार सनदे - टेम्पोचालक, उचगाव

वाटेत तरुणीशी संवाद

बी.ई. सिव्हिलचे शिक्षण पूर्ण केलेली उचगावमधील तरुणी प्राजक्ता संकपाळ ही सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. अभ्यासासाठी जाताना तिला पोलिसांनी आंबेडकर चौकात अडवले. त्याचवेळी तिथे पोहोचलेले राहुल गांधी यांनी प्राजक्ताला बोलवून घेऊन तिच्याशी चर्चा केली. कोल्हापुरात तरुणांसाठी नोक-या आहेत काय? असा प्रश्न त्यांनी विचारल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.

Web Title: Congress leader Rahul Gandhi dined at the home of a Dalit family in Uchgaon in Kolhapur Homemade vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.