कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आजचा शुक्रवारचा दौरा अचानक सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रद्द झाला. त्याच्या दिल्लीहून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला.आता ते उद्या शनिवारी सकाळी ८.४५ वाजता कोल्हापुरात येणार असून त्यांच्याच हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार सतेज पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला. या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्याच हस्ते होईल असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार राहुल गांधी आज शुक्रवारी ५.४० वाजता कोल्हापुरात येणार होते. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. परंतू अचानक दौऱ्यात बदल झाल्याची बातमी आली. आता उद्या सकाळी ते १० वाजता त्यांच्या हस्ते पुतळा अनावरण सोहळा होईल. त्यानंतर ते शाहू समाधीस्थळी राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करतील. त्यानंतर संविधान सन्मान परिषदेस उपस्थित राहून सायंकाळी खास विमानाने दिल्लीस रवाना होतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला या दौऱ्याबद्दल उत्सुकता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
By विश्वास पाटील | Published: October 04, 2024 6:00 PM