विविध पदांवर दिली संधी : प्रस्थापित नेत्यांना बाजूला करत तरुणांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
सुहास जाधव
पेठवडगाव : वडगाव कृषी उत्प्पन बाजार समिती म्हणजे दिग्गज नेते, पुढाऱ्यांचा आखाडा, अशी परिस्थिती होती. पण यंदा महाविकास आघाडी सरकार व काँग्रेस आमदार राजू आवळे यांच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशासकीय प्रशासकीय मंडळात संधी मिळाली. आमदार आवळे यांनी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्याचा चंग बांधल्यामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळत नाही, अशी टीका अनेक वेळा होत असते. या पक्षातील नेते म्हणजे डामडौल असणारे वजनदार नेते, अशी आजपर्यंतची स्थिती होती. मात्र राजकारणातील बदलत्या समीकरणामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील, आमदार राजू आवळे यांनी तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर हातकणंगले मतदारसंघातील हातकणंगले नगरपरिषदेची निवडणूक, संजय गांधी निराधार योजना समिती, वडगाव बाजार समिती प्रशासकीय मंडळात काँग्रेस नेत्यांनी तरुणांसह पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ज्यांनी या पदांचा विचार देखील केला नव्हता, त्यांना देखील संधी देत काँग्रेस नेत्यांनी सुखद धक्का दिला आहे. भविष्यातील राजकारण पाहत आमदार आवळे यांनी तरुणांना जास्तीत जास्त संधी आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारल्याचे सध्याच्या घडामोडीतून दिसत आहे. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांची साथ मिळत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या बदलामुळे सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेत्यांचा भाव वधारला आहे.
पक्षनिष्ठा ठरली सार्थकी
वडगाव बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी सावर्डे येथील तरुण कार्यकर्ते चेतन चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. चव्हाण कुटुंबीय हे गेल्या दोन पिढ्यांपासून काँग्रेसनिष्ठ असून जयवंतराव आवळे यांचे निष्ठावंत आहेत. गेली १५ वर्षे आमदारकी, सत्ता नसताना देखील चव्हाण कुटुंबीय पक्षनिष्ठ राहिले. या पक्षनिष्ठेचे फळ त्यांना सभापती रुपात मिळाले आहे.
कोट :
विधानसभा निवडणुकीत जे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. यापुढेही पक्षासाठी सक्रिय कार्यकत्यांना न्याय देवू
- राजू आवळे, आमदार, हातकणंगले विधानसभा