समीर देशपांडे।कोल्हापूर : उत्तम संघटनकौशल्य असणाऱ्या प्रकाश आवाडे यांच्याकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. २०११ साली ज्या पदासाठी संघर्ष करावा लागला, तेच पद सन्मानाने आवाडे यांच्याकडे आले असले तरी त्यांच्यासमोर आव्हानांचाही मोठा डोंगर आहे. नेत्यांमधील ‘मनभेद’ संपविण्यात त्यांना यश आले तरच कॉँग्रेससाठी जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.
गेली २० वर्षे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पी. एन. पाटील यांच्याकडे होते. जरी विधानसभेला काही वेळा पराभव स्वीकारावा लागला असला तरीही त्यांना सहज डावलणे नेत्यांना शक्य झाले नव्हते.आठ वर्षांमध्ये पंचगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दिल्लीतील आणि राज्यातील सत्ता गेली आणि सतेज पाटील वगळता जिल्ह्यात एकही आमदार नाही. आजरा तालुक्यात सर्व सत्तास्थाने भाजप आणि राष्ट्रवादीकडे आहेत. चंदगडमध्ये भरमूअण्णा पाटील, तर गडहिंग्लजमध्येही राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. कागलमध्ये तर कॉँग्रेसचे कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली आहे. भुदरगडमध्ये बजरंग देसाई कॉँग्रेसमध्ये, तर त्यांचे चिरंजीव राहुल भाजपमध्ये अशी अवस्था आहे.
राधानगरी आणि करवीरमध्ये पी. एन. पाटील यांना मानणारा कॉँग्रेसचा मोठा गट आहे. पन्हाळ्यातही कॉँग्रेसची अवस्था वाईट आहे. शिरोळमध्ये गणपतराव पाटील आणि हातकणंगलेमध्ये जयवंतराव आवळे यांच्या रूपाने कॉँग्रेसचे मजबूत नेतृत्व आहे. गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. शाहूवाडीतही कॉँग्रेसला मोठे परिश्रम घ्यावे लागतील. यापुढे ‘गोकुळ’च्या माध्यमातून कॉँग्रेसचे राजकारण करण्याला मर्यादा येणार आहेत. जेथे महाडिक समर्थक कॉँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर आवाडे यांचे विशेष ‘लक्ष’ राहणार आहे.आवाडे यांच्या सर्व संस्था इचलकरंजी परिसर आणि हातकणंगले तालुक्यात असल्याने त्यांचे जिल्ह्यातील अन्य नेत्यांवर फारसे काही अवलंबून नाही. मात्र, कॉँग्रेसच्या सर्व नेत्यांचीच मोट ते किती प्रभावीपणे बांधू शकतात, यावरच हे यश अवलंबून आहे.ताराराणी आघाडी विसर्जित करावी लागेलकॉँग्रेसमध्ये स्थान दिले जात नाही, या संतापातून आवाडे यांनी सव्वादोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ‘ताराराणी आघाडी’च्या माध्यमातून सवता सुभा मांडला होता. एवढेच नव्हे, तर जेव्हा पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे आले तेव्हा भाजपला पाठिंबा देत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. त्यामुळे आपली आघाडी विसर्जित करून आवाडे यांना जिल्हा परिषदेतही पक्षाच्या पाठीशी राहावे लागणार आहे.सर्व बाजूंनी मजबूत : आवाडे यांचे सहकारातील साम्राज्य एवढे आहे की, त्यांना निधीसाठी पक्षावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आवाडे हे सर्व बाजूंनी मजबूत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आवाडे हे जिल्हाभर चांगली वातावरण निर्मिती करू शकतात.काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदल माझ्या संमतीनेचपी. एन.: पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज अनुपस्थितकोल्हापूर : आपण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज, शुक्रवारी प्रकाश आवाडे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिले आहे. आवाडे यांची ही निवड माझ्या संमतीनेच झाल्याचे सांगत, आपल्या अनुपस्थितीची कल्पना आवाडे यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पी. एन. पाटील म्हणाले, अध्यक्ष बदल हा माझ्यावरील अन्याय नव्हे. याआधीही मी सहा वेळा लेखी राजीनामा दिला होता; मात्र तो नेत्यांनी स्वीकारला नव्हता. २७ डिसेंबरला मी पदाचा राजीनामा देत असताना तोदेखील स्वीकारला गेला नाही. यानंतर तीन-चार वेळा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या विषयावर माझ्याशी चर्चा केली. ‘गोकुळ’मध्ये काही परिणाम होणार नाही. सर्वच सहकारी संस्थांमध्ये अन्य पक्षांना स्थान दिले जाते. भोगावती कारखाना जरी अपवाद असला तरी जिल्हा बॅँकेतही सर्व पक्षांचे लोक आहेत, याकडे पी. एन. पाटील यांनी लक्ष वेधले.