कोल्हापूर : शहरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच घटकांना न्याय देणारा काँग्रेस पक्षाचा निवडणूक जाहीरनामा बुधवारी सायंकाळी काँग्रेस कार्यालयात झालेल्या एका छोट्या समारंभात घोषित करण्यात आला. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. आता पुढील पाच वर्षांत ई गव्हर्नन्स तसेच ‘आयटी हब’ला प्राधान्य देण्यात येईल, असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, सुरेश कुराडे, सरलाताई पाटील, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागच्या निवडणुकीतील बहुतांशी सर्वच आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला; परंतु काही कामे ही तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिली असली, तरी ती पूर्ण करण्याला आमचे प्रथम प्राधान्य असेल, असे सांगून सतेज पाटील यांनी सांगितले की, ‘ई गव्हर्नन्स’ पद्धत राबविण्यामागे शहरातील जनतेला जलद आणि सुलभपणे सेवा मिळवून देण्याचा आमचा हेतू आहे. शहरातील पाच लाख लोक घरबसल्या कामे करू शकतील, असे अॅप आम्ही आणणार आहोत. ही योजना पूर्ण करण्यास पुढचे एक वर्ष जाईल; पण त्यानंतर मात्र जनतेचा त्रास कमी होईल. देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे, आता कोल्हापूरच्या विकासासाठी निधी आणू, असा भाजपचा दावा आहे, याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, हा भाजपचा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न आहे. जर त्यांची सत्ता महापालिकेवर आली नाही, तर विकासाला निधी देणार नाहीत का, हे भाजपने आधी सांगावे. सत्ता कोणाचीही असली तरी पक्षीय अभिनिवेश बाळगता कामा नये. काँग्रेसची देशात व राज्यात सत्तेवर असताना भाजप, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अनेक महापालिकांना निधी दिला होता, हे त्यांनी लक्षात घ्यावे. गेल्या वर्षभरात राज्यात तर त्या आधीपासून केंद्रात सत्ता आहे. मग पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी का भरपूर निधी आणला नाही. ‘स्मार्ट सिटी’त समावेश होण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत, असा सवाल उपस्थित करत, निवडणुकीत आम्ही १२०० कोटींचा निधी आणला, याची चर्चा होणार म्हटल्यावर पालकमंत्र्यांनी २० कोटींचा निधी आणला; परंतु वर्ष-दीड वर्षांत भरपूर काही करता येण्यासारखे होते, भाजपने काहीच केले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा थेट पाईप लाईन योजना दोन वर्षांत पूर्ण करणार ‘ई गव्हर्नन्स’च्या माध्यमातून सर्वप्रकारची बिले आॅनलाईन भरण्याची सुविधा देणारनागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरीता मोबाईल अॅप तयार करणार. प्रस्तावित गावांतील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार. कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी पाठपुरावा करणार. ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. शाहू मिलच्या जागेवर शाहू स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार.गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारणार. पहिल्या सहा महिन्यांतच महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे बांधणार. विविध ठिकाणी फ्लाय ओव्हर बांधणार. ज्येष्ठ नागरिक ांसाठी विरंगुळा केंद्र व के.एम.टी. पासमध्ये सवलत देणार. रंकाळा व कळंबा येथे लहान मुलांसाठी विशेष खेळणी देणार. रंकाळा व कळंबा तलाव प्रदूषणमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणार. टोलमुक्तीसाठी उतरणार : रस्त्यांकडे आमचं दुर्लक्ष झालं खासगीकरणातून रस्ते करण्याचा आमचा हेतू चांगला होता; परंतु आमच्याकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रस्ते प्रक ल्पाचे काम खराब झाले. त्याविरुद्ध आंदोलन झाले. खराब कामाचे पैसे का द्यावेत, हा आमचाही दावा आहे. आता निवडणूक आल्यामुळे भाजप-शिवसेना टोल रद्द करणार, असे सांगत आहेत; परंतु त्यांचा हा फसवा प्रचार आहे; परंतु आता आम्ही नगरसेवकांना घेऊन कायमस्वरूपी टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व घटकांना न्याय हाच काँग्रेसचा जाहीरनामा
By admin | Published: October 22, 2015 12:42 AM