'मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत ढकले', आमदार पी. एन. पाटलांची भव्य पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 04:31 PM2021-12-18T16:31:09+5:302021-12-18T16:35:10+5:30
मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप आमदार पी. एन पाटील यांनी केला.
कोपार्डे : गेल्या ७० वर्षात काँग्रेसने सहकारी बँका, साखर कारखाने, बाजार समित्या, शिक्षण संस्था स्थापन करून खेडी व शेतकरी आर्थिक दृष्टीने समृद्ध केली. पण मोदी सरकारच्या काळात मोदीच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून ठार मारले. शेतकरी काय मोदी सरकारचे वैरी होते काय? असा सवाल आमदार पी. एन पाटील यांनी उपस्थितीत करत मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप केला.
आज बीड शेड ते क। बीड दरम्यान करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या महागाई विरोधातील पदयात्रानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी बंगळुरु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील,पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील,राजेंद्र सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विरोधात महागाई बद्दल गरळ ओकणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचा दर १०० रूपयेच्यावर, घरगुती गँस एक हजार रुपये करून सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. शासकीय कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. यावरून मोदी देश कोठे घेऊन गेले आहेत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकार आले तरच देश वाचणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दररोज एक तास जनतेत प्रबोधन करावे असे आवाहन केले.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.