कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदारपी. एन. पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असून, स्थिर असल्याची माहिती अस्टर आधार रुग्णालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी देण्यात आली. रविवारी सकाळी ब्रश करताना मेंदूत रक्तस्राव होऊन ते बाथरूममध्ये कोसळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईचे मेंदू शल्य चिकित्सक व आमदार पाटील यांचे जिवलग मित्र डॉ. सुहास बराले हेदेखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिलेली माहिती अशी : आमदार पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्रावासाठी रविवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास व आधुनिक जीव रक्षण यंत्रणांवर उपचार चालू आहेत. सोमवारी त्यांच्या केलेल्या तपासण्या पाहता, रक्त गोठवण्याची प्रक्रिया ही सध्या योग्य बदल दाखवत आहे. मेंदूतील रक्तस्राव व त्यानंतर येणारी मेंदूची सूज या सर्व गोष्टी लक्षात घेता, यामधील सुधारणांसाठी आता काळजी वाटते. सध्या अति दक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छ्वास व आधुनिक जीव रक्षण सुविधा यांच्या साहाय्याने त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.सोमवारी सकाळपासून अस्टर आधार हॉस्पिटल परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दिवसभरात शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, माजी आमदार अमल महाडिक, निपाणीचे माजी आमदार काका पाटील, वीरकुमार पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, विशाल पाटील, विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला येऊन राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून आमदार पाटील यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली.
कार्यकर्त्यांकडून प्रार्थना..रविवारी आमदार पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच कार्यकर्ते हवालदिल झाले. त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी, यासाठी सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात होती.प्रकृतीबद्दल आस्थेने चौकशी..आमदार पाटील हे करवीरचे आमदार असले तरी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रमुख नेते असल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना काळजी लागून राहिली आहे. लोक दिवसभर त्यांच्या चौकशीबद्दल आस्थेने चौकशी करीत असून, काळजी व्यक्त करीत आहेत.काळजीने अस्वस्थ..रविवारी सकाळी आमदार पाटील हे बाथरूममध्ये पडल्यापासून त्यांचे अत्यंत जिवलग मित्र असलेले संजय करजगार, रणजित पाटील, बबलू अंगडी, सदाशिव डोंगळे, यशवंत तिवारी तसेच बाळासाहेब खाडे, शिवाजी कवठेकर हे रुग्णालयात ठाण मांडून आहेत. दोन दिवस त्यांना आमदार पाटील यांच्या काळजीने अन्नाचा घासही गोड लागलेला नाही.