कॉँग्रेस-राष्टवादीचे एक साथ वर ‘हात’! महापौर-उपमहापौर निवड : सेनेची भूमिका ठरली निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:29 AM2018-05-26T01:29:59+5:302018-05-26T01:29:59+5:30

फुटाफुटीची चर्चा, वधारणारा भाव यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या नेत्यांनी समयसूचकता दाखवून शोभा बोंद्रे आणि महेश सावंत यांना दिलेली उमेदवारी व त्यानंतर नगरसेवकांना संपर्काबाहेर ठेवण्यासाठी घेतलेल्या दक्षतेमुळेच भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांना ‘चमत्कार’

 Congress-Nationist 'Hands Up' Together! Mayor-Dy. Mayor Choosing: The role of the Army has been decisive | कॉँग्रेस-राष्टवादीचे एक साथ वर ‘हात’! महापौर-उपमहापौर निवड : सेनेची भूमिका ठरली निर्णायक

कॉँग्रेस-राष्टवादीचे एक साथ वर ‘हात’! महापौर-उपमहापौर निवड : सेनेची भूमिका ठरली निर्णायक

Next
ठळक मुद्देनेत्यांची समयसूचकता, दक्षतेमुळे विजयश्री

कोल्हापूर : फुटाफुटीची चर्चा, वधारणारा भाव यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या नेत्यांनी समयसूचकता दाखवून शोभा बोंद्रे आणि महेश सावंत यांना दिलेली उमेदवारी व त्यानंतर नगरसेवकांना संपर्काबाहेर ठेवण्यासाठी घेतलेल्या दक्षतेमुळेच भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांना ‘चमत्कार’ दाखविता आला नाही. ‘स्थायी’ सभापती निवडीवेळी गाफील राहिलेले नेते या निवडणुकीत दक्ष राहिले, त्यामुळे ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटण्याची, ‘चमत्कार घडविण्याची’ वल्गनाच ठरली.

सभेपूर्वी अर्धा तास अगोदर आमदार सतेज पाटील हे काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार यांना घेऊन आले, पाठोपाठ आघाडीचेच ४१ नगरसेवक घेऊन आरामबस महापालिकेत पोहोचल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा विजय निश्चित झाला. शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरूनही तटस्थ राहिल्याने भाजप तारराणी आघाडीचे मनसुबे उधळले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
काँग्रेसचा महापौर तर उपमहापौर राष्टÑवादी पक्षाचा निवड झाल्यानंतर महापालिकेबाहेर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडीनंतर नूतन महापौर शोभा बोंद्रे व नूतन उपमहापौर महेश सावंत यांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.

चंद्रकांत पाटील - सतेज पाटील यांच्यात चर्चा
कोल्हापूर : महापौर निवड झाल्यानंतर तासाभरातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी ‘बंद दाराआड चर्चा’ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या दोघांमध्ये चर्चा झाली.

कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाच्या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. महापौर निवड आटोपून आमदार सतेज पाटील ही या बैठकीमध्ये सहभागी झाले. बैठक संपल्यानंतर सतेज पाटील यांनी मंत्री पाटील यांना बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर दोघेही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात गेले. यावेळी तेथील दोन शिपायांनाही बाहेर थांबण्यास सांगण्यात आले.

या दोघांच्या चर्चेवेळी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, शौमिका महाडिक आणि अधिकारीवर्ग बाहेर थांबले होते. दहा मिनिटांनंतर दोघेही बाहेर आले. महापौर निवडीसाठी पहिल्या टप्प्यात भाजपने शड्डू ठोकला होता. मात्र, यामध्ये घोडेबाजार होणे, तणाव निर्माण होणे, आरोप-प्रत्यारोप यातून राजकीय धुरळा उठणार होता. या सत्तासंघर्षामध्ये दोन्ही पक्षांना काही नगरसेवक वेठीस धरण्याचीही शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी या सत्तासंघर्षात टोकाची भूमिका घेणे टाळले आणि त्यानुसार शांत पद्धतीने महापौर निवड पार पडली. या पार्श्वभूमीवर या दोघांची झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते.

शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले आल्या अन् गेल्याही
सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता होती; पण शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले-उत्तूरे या एकट्याच पायी आल्या. त्यांनी काही वेळांतच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, पीठासन अधिकाºयांची परवानगी घेऊन सभा सुरू होण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होता त्या महापालिकेतून बाहेर आल्या, त्यांनी बाहेर येऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे उर्वरित तीन नगरसेवक महापालिकेकडे फिरकलेच नाहीत.

नेते, माजी नगरसेवकही महापालिकेबाहेर
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून फक्त उमेदवार, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाºयांनाच ओळखपत्र पाहून आत सोडले जात होते. त्यामुळे उमेदवारांसोबत आलेले सर्व आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यासह इतर नेते, माजी नगरसेवक, समर्थकांना पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारातच रोखले. त्यामुळे सर्व नेतेमंडळी काही वेळ महापालिकेच्या बाहेरच आवारात थांबले होते.

नेत्यांनी घेतली दक्षता
काँग्रेस-राष्टÑवादीचे ४१ नगरसेवकांना घेऊन बेळगांवहून शुक्रवारी सकाळीच नेते ‘अजिंक्यतारा’वर पोहोचले. तेथे सर्व नगरसेवकांना गुलाबी फेटे बांधून ते आरामबसमधून महापालिकेत आले. ही आरामबस महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात उभा केली. तेथे नगरसेवकांना कोणीही भेटू नये-चर्चा करू नये याची पूर्णपणे दक्षता घेतली होती. त्यासाठी ऋतुराज पाटील यांच्यासह आदिल फरास, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, नंदू मोरे, राजेश लाटकर आदींनी सर्व नगरसेवकांना सुरक्षाकडे तयार करून त्यांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले. तत्पूर्वी सुभाष बुचडे हे काही नेत्यांसोबत पुढे आले होते.

पिरजादे, चव्हाण यांच्यावर लक्ष
‘स्थायी’ सभापती निवडणुकीत फुटलेले अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या राष्टÑवादीच्या दोन नगरसेवकांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. ही सभा सुरू होण्यापूर्वी स्थायी समितीचे माजी सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी नगरसेवक विनायक फाळके, सदाशिव यवलूजे हे त्यांना घेऊन महापालिकेत आले. त्यांना सभागृहात जाण्यापूर्वी कोणाशीही भेटू अगर चर्चा करू दिले नाही. सभागृहातही त्यांच्या एकाबाजूला सुभाष बुचडे तर दुसºया बाजूला संजय मोहिते यांना बसविले होते. मतदान करतेवेळी हात वर करायला लावण्याची जबाबदारी बुचडे व मोहिते यांच्यावर होती.

सतेज पाटील यांनी केले सारथ्य
महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे शोभा बोंद्रे आणि महेश सावंत या दोघांना तिरंगी फेटे परिधान करून स्वत: आमदार सतेज पाटील यांनी मोटार चालवत महापालिकेत इन्ट्री केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर हेही उपस्थित होते. सतेज पाटील उमेदवारांना घेऊन आल्यानंतर उपस्थितांनी काँग्रेस-राष्टÑवादी विजयाच्या घोषणा दिल्या.

Web Title:  Congress-Nationist 'Hands Up' Together! Mayor-Dy. Mayor Choosing: The role of the Army has been decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.