कोल्हापूर : राज्यातील पाच जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्या असताना यातील चार मतदारसंघांमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील काहींनी पक्षामार्फत अर्ज दाखल केलेत. अशा परिस्थितीत आम्ही कसे काम करायचे, अशी विचारणा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांची पाटील, भगवान काटे यांनी शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलवर भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा आज, शनिवारी सकाळी आठ वाजता आम्ही आघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजू शेट्टी यांनाही बोलावले आहे. तिथे आम्ही निर्णय घेऊ, तसेच काँग्रेसच्या नेत्यांशीही मी बोलतो, असे पवार यांनी सांगितले.
खामगाव, नंदूरबार, वरूस मोर्शी, मिरज आणि शिरोळ या पाच जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्या आहेत. असे असतानाही खामगावमधून कॉँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. नंदूरबारमधून कॉँग्रेसचेच उदयसिंह पाडवी यांनीही अर्ज दाखल केला आहे. या दोघांना कॉँग्रेसने ए-बी फॉर्म दिले आहेत. वरूस मोर्शी येथून कॉँग्रेसचे गिरीश कराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे; तर शिरोळमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनाही राष्ट्रवादीने ए-बी फॉर्म दिला असून, त्यांनीही अर्ज दाखल केल्याची माहिती पाटील यांनी पवार यांना दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील आमदार भारत भालके, सांगलीचे नामदेव मोहिते, माजी महापौर सुरेश पाटील यांनीही पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे, बाबूराव हजारे उपस्थित होते.