कसबा बावडा : महापौरपदाची सहा-सहा महिन्यांची खांडोळी करीत काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रतिष्ठेचा कचरा केला आहे, असा आरोप परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केला. लाईन बझार बसस्टॉप चौकात आयोजित केलेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, संग्राम कुपेकर यावेळी प्रमुख उपस्थित होते. रावते म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची महापालिकेवर सत्ता असतानाही त्यांना मूलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत. आजही शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शहराच्या अनेक भागात ड्रेनेज लाईन नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविलेला नाही. दूषित पाण्याचा बंदोबस्त नाही. दूषित पाण्यामुळे पंचगंगेचे पाणी दूषित होऊन कोल्हापूर आणि इंचलकरंजीतील लोक आजारी पडले. काहीजण मृत्युमुखी पडले; पण याकडे कोणाचे लक्ष नाही. शहराच्या पालकमंत्र्याना कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न दिसत नाही. त्यांना महापालिकेत समर्थन मिळणार नाही म्हणून त्यांनी ताराराणीशी आघाडी केली. त्यामुळे चंद्रकांतदादांनी विश्वास गमावला आहे. शहरातील महाडिक आणि कंपनी म्हणजे उठवळ आहे. ते स्वत:च्या फायद्यासाठी आणि सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करतात. जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांच्या राजकारणासाठी केला आहे. आता शिवसेनेला संधी द्या. कोल्हापूर शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना कधीही जातीय राजकारण करीत नाही. यावेळी संग्राम कुपेकर, उमेदवार शाहीन काजी, शकुंतला माने यांची भाषणे झाली.
काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रतिष्ठेचा कचरा केला
By admin | Published: October 27, 2015 1:10 AM