कोल्हापूर : शिवाजी पेठेमध्ये सर्वच निवडणुका चुरशीने होतात. महापालिकेची गतवर्षीची निवडणूकही चर्चेचा विषय ठरली होती. सहापैकी चार प्रभागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली होती. आगामी निवडणुकीमध्येही दोन्ही काँग्रेसचे भाजप-ताराराणीसह शिवसेनेला तगडे आव्हान ठरणार आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण अद्यापही जाहीर झाले नसले तरी शहरात चर्चा मात्र रंगू लागली आहे. इच्छुकांनी आतापासून पायांना बाशिंो बांधली आहेत. शिवाजी पेठेतही चौकाचौकांमध्ये राजकीय चर्चा सुरू आहे. पेठेत महापालिकेचे सहा प्रभाग येतात. गत निवडणुकीमध्ये येथे चुरस झाली होती. सहापैकी दोन जागा काँग्रेस, दोन जागा राष्ट्रवादी, तर भाजप, ताराराणी आघाडीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
शिवसेना भोपळा फोडणार काय?
एकेकाळी शिवाजी पेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता मात्र येथील चित्र बदलले आहे. महापालिकेच्या गतवेळच्या निवडणुकीमध्ये एकही जागा निवडून आणता आली नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्येही काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांना मताधिक्य मिळाले होते. या वर्षी रविकिरण इंगवले शिवसेनेचे शहरप्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
‘पदवीधर’मध्ये हातात हात, महापालिकावेळी आमनेसामने
पदवीधर मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढली. महापालिकेची निवडणूक मात्र, स्वतंत्र लढून नंतर आघाडी होणार असल्याचे संकेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत एकसंध असलेले पेठेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेते महापालिकेच्या निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत.
पेठेत प्रत्येक पक्षाचे तुल्यबळ नेते
शिवाजी पेठेत सर्वच पक्षांतील मातब्बर नेते आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, विक्रम जरग, शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजित राऊत, उत्तम कोराणे यांचा यामध्ये समावेश आहे. या नेत्यांची महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
शिवाजी पेठेतील प्रभाग
प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई, प्रभाग क्रमांक ४८ तटाकडील तालीम, प्रभाग क्रमांक ५४ चंद्रेश्वर, प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान, प्रभाग क्रमांक ५६ संभाजीनगर बसस्थानक, प्रभाग क्रमांक ५७ नाथा गोळे तालीम.
गत निवडणुकीतील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी : २
काँग्रेस : २
भाजप : १
ताराराणी आघाडी : १
शिवसेना : ०