वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘लोकमत’ने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम आखली असून या आठवड्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे आणि वंचित आघाडीच्या राज्यातील २८८ मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक आघाडी करून लढविली असली तरी कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या पक्षांवर विश्वासच राहिलेला नाही. शिवाय भाजपची सत्ता पुन्हा एकदा आली तरी चालेल. मात्र, आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर भर द्यावा, अशी स्पष्ट भावना कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे जाणवते.महाराष्ट्रातील सातही विभागांतील २८८ मतदारसंघांत या मोहिमेपैकी पहिला सर्व्हे काल पूर्ण करण्यात आला. त्यात या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २४० जागांवर आघाडी झाली असून, उर्वरित जागांवर इतर घटक पक्षांशी बोलणी करून आघाडीस अंतिम रूप देण्यात येईल, असे म्हटले असले तरी कॉँग्रेसच्या ६५ टक्के कार्यकर्त्यांना असे वाटते की, भाजपने केंद्रात सत्ता मिळविल्याने विधानसभा निवडणुकीतही वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कॉँग्रेसचे पानिपत झाले असले तरी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी केल्याने अनेक जिल्ह्यांत पक्षाची ताकद वाढण्यास मर्यादा आल्या आहेत.शिवसेना-भाजपविरुद्ध महाआघाडीच हवीमहाराष्ट्रात भाजपला शिवसेना पर्याय होऊ शकत नाही, कॉँग्रेसला राष्ट्रवादी कॉँग्रेस पर्याय ठरू शकत नाही, असे मत नोंदविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी भाजपला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस विचारसरणीच पर्याय असू शकते. याउलट राष्ट्रवादीने काहीवेळा ‘सोयीची भूमिका’ घेतली आहे, अशीही भावना आहे. उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक आणि हिंदू समाजातील मोठा वर्ग कॉँग्रेसला मानणारा आहे. हा वर्ग दूर जाऊ नये यासाठी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली पाहिजे. राष्ट्रवादी कॉँग्रेस विश्वासार्ह नाही, या पक्षाशी आघाडी केल्याने अनेक मतदारसंघांतील ताकद संपली आहे. पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत, असे मत व्यक्त करून आता नसेल तरी पुढील निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून देणे योग्य ठरेल, असेही त्यांना वाटते.राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते आघाडीच्या बाजूने आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ, त्यांना मानणाºया अनेक समाज घटकांच्या आघाडीमुळे पाठिंबा मिळविणे सोपे जाते, हा अनुभव केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वेळी कामी आलेला आहे, असे त्यांचे मत आहे. यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीसाठी ते अनुकूल मत नोंदवत आहेत, असे दिसते. राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही, तेथे कॉँग्रेसची मदत गरजेची आहे, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस संपुष्टात येईल, असेदेखील बहुसंख्याकांचे मत आहे.मनसे किंवा वंचित विकास आघाडीपैकी कोणाशी आघाडी करावी, या प्रश्नांवर कॉँग्रेस कार्यकर्ते फारसे अनुकूल नाहीत. याउलट मनसे किंवा वंचित विकास आघाडीचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास अनुकूल आहेत. त्यांच्या मतानुसार, सध्याची भाजपची ताकद पाहता महाराष्ट्रात कोणताही एकच पक्ष त्यांचा पराभव करू शकेल, असे दिसत नसल्याने महाआघाडी करावी. त्यात बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आदी घटक पक्षांनाही सामावून घेण्याची मागणी मनसे आणि वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.