अमर पाटीलकळंबा : करवीर तालुक्यातील यशवंतग्राम निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या, राजकीय दृष्ट्या संवेदनशील कळंबा गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाच्या सुमन विश्वास गुरव यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आज, अर्ज माघार घेण्याच्या विहित मुदतीत इच्छुक अन्य तिन्ही महिला उमेदवारांनी माघार घेतली. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या इतर मागासवर्गीय महिला आरक्षित निवडणुकीसाठी महाडिक गटाला उमेदवार मिळाला नाही. तर आमदार सतेज पाटील गटाकडून माजी सरपंच वनिता सागर भोगम, अश्विनी जाधव, सुमन विश्वास गुरव, वैशाली दिलीप टिपूगडे या इच्छुक होत्या. टिपूगडे व जाधव यांनी आमदार पाटील यांच्या सुचनेनुसार तात्काळ माघार घेण्याचा शब्द दिला. तर विनिता भोगम, सुमन गुरव निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. आज, बुधवारी सकाळी आमदार सतेज पाटील यांनी दोन्ही महिला उमेदवारांची मते जाणून घेऊन सुमन विश्वास गुरव यांचे नाव निश्चित केले. विहित मुदतीत विनिता भोगम यांनी अर्ज माघार घेतल्याने सुमन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. गट एकसंघ दोन महिला इच्छुक उमेदवारांतून प्रबळ उमेदवार निवडताना मोठी कसरत होणार होती. आमदार सतेज पाटील यांनी सागर भोगम यांनी सरपंचपदी तर त्यांच्या बहीण अश्विनी रामाने यांनी महापौरपदी काम करण्याची संधी दिली होती. सुमन गुरव या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याची निवड करून त्यांनी गट एकसंघ ठेवला.
gram panchayat election: कोल्हापुरात काँग्रेसने उघडले विजयी खाते, कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 4:23 PM