कोल्हापूर : काँग्रेसचे अनेक नेते महाराष्ट्रात येऊन ‘कर्नाटक पॅटर्न’ची उदाहरणे देत आहेत. परंतु काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या होत्या. त्या पैसे नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आमदार निधीचीही टंचाई भासू लागल्याने आमदारांनी या योजना बंद करण्याची मागणी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यामुळे ‘कर्नाटक पॅटर्न’ ही फसवणूक असून, महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या या आश्वासनांना भुलू नये, असे आवाहन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आणि कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक उपस्थित होते.जोशी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी महिलांना मोफत बस प्रवासाची योजना जाहीर केली. परंतु निधीअभावी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दुसरा पर्याय म्हणून आता धावणाऱ्या बसेसची संख्याच कमी करण्यात येत आहे. बस वेळेवर येत नाहीत, यासाठी आंदोलने सुरू आहेत.दर महिन्याला महिलांना २ हजार रुपये देण्याच्या गृहलक्ष्मी योजनेचे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे अजून मिळालेले नाहीत. २०० युनिट मोफत वीज घोषणेचाही बोजवारा उडाला असून, साडेतीन लाख बेरोजगारांपैकी केवळ ३५०० जणांना रोजगार मिळाला आहे. महिन्याला १० किलो तांदूळही दिला जात नसून त्यातील पाच किलाे केंद्र शासनच देत आहे.
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
By समीर देशपांडे | Published: November 16, 2024 7:02 PM