इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:31 PM2022-04-21T18:31:09+5:302022-04-21T18:32:41+5:30
कोल्हापूर : पेट्रोल , डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत ...
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शहरातील विविध ठिकाणी रॅली काढून पथनाट्य सादर करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
येथील काँग्रेस कमिटीपासून सकाळी साडेदहा वाजता रॅली सुरू झाली. दाभोळकर कॉर्नर, पार्वती टॉकीज येथील पेट्रोल पंपांसमोर निर्दशने आणि पथनाट्य सादर करण्यात आले. तेथून संभाजीनगर येथील पेट्रोलपंपासमोर पथनाट्य सादर करून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत रिक्षावर भोंगा लावण्यात आला होता. त्यावर निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. महिला कार्यकर्त्यांनी पथनाट्य सादर केले.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सचिव संजय पोवार-वाईकर, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, एनएसयूआयचे अध्यक्ष अक्षय शेळके, संजय मोहिते, दुर्वास कदम, विक्रम जरग, प्रदीप चव्हाण, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे, अमर समर्थ, आदी सहभागी झाले होते.
हेच का? अच्छे दिन
या आंदोलनात ‘पेट्रोल, डिझेल शंभरपार, मोदी बस्स करा, जनतेची लूटमार’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. सिलिंडरचे दर लिहिलेले फलक हातात घेऊन त्यांनी ‘हेच का? अच्छे दिन’ अशी विचारणा केली.