इचलकरंजी : जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून केंद्र व राज्य सरकार गोरगरिबांवर अन्याय करीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी आणि तूरडाळ, उडीदडाळ आणि मूगडाळीचे रास्तभाव दुकानातून वितरण करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीयांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. सणांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार अनिल साळुंखे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, महागाईला आळा घालून जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर कमी करून रास्तभाव दुकानातून जीवनावश्यक पुरवठा करण्यात यावा, असे नमूद केले आहे.आंदोलनात अशोकराव आरगे, शशांक बावचकर, अहमद मुजावर, रणजित जाधव, अशोकराव सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, तौफिक मुजावर, राजू बोंद्रे, सतीश कोष्टी, नरसिंह पारीक, रत्नप्रभा भागवत, शकुंतला जाधव, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: October 21, 2015 9:48 PM