महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहने शनिवारी विनाटोल सोडणार, काँग्रेसचे आंदोलन

By पोपट केशव पवार | Published: July 31, 2024 02:21 PM2024-07-31T14:21:24+5:302024-07-31T14:22:27+5:30

कोल्हापूर : पुणे- कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल सात तास लागत आहेत. त्यामुळे ...

Congress protest against the state of the highway. Vehicles on the Kolhapur-Pune highway will leave without toll on Saturday | महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहने शनिवारी विनाटोल सोडणार, काँग्रेसचे आंदोलन

महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहने शनिवारी विनाटोल सोडणार, काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल सात तास लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, या मागणीसाठी काँग्रेसकडून येत्या शनिवारी (दि. ३) सकाळी १० वाजता कोल्हापूर-पुणे महामार्गावरील चारही टोलनाक्यांवरील वाहने मोफत सोडण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुणे-कोल्हापूर महामार्गाची अवस्था प्रचंड दयनीय झाल्याने याविरोधात काॅंग्रेसने एल्गार पुकारला असून, यासंदर्भात दिशा ठरवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून बुधवारी कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जतचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, पुणे-कोल्हापूर महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात-सात तास लागत आहेत. रस्त्यांची इतकी वाईट अवस्था असताना टोल का द्यायचा? हा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल देणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यासाठीच शनिवारी या महामार्गावरील चारही टोलनाक्यांवर येणारी वाहने विनाटोल सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल. यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने यात सहभागी व्हावे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या महामार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. इतके खड्डे असतानाही टोल घेणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. यावेळी विश्वजित कदम, संजय जगताप, सांगलीचे पृथ्वीराज पाटील यांच्यासह चारही जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

कुठे होणार आंदोलन

- कोल्हापूर : किणी टाेलनाका
- सातारा : आणेवाडी टोलनाका
- कऱ्हाड, सांगली : तासवडे टोलनाका
- पुणे : खेड शिवापूर टोलनाका

Web Title: Congress protest against the state of the highway. Vehicles on the Kolhapur-Pune highway will leave without toll on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.