congress kolhapur- इंधन, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:11 PM2021-06-07T17:11:41+5:302021-06-07T17:13:34+5:30
PetrolHike Congress Kolhapur : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेशात येत पेट्रोलच्या दराने सेंच्युरी पार केल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेशात येत पेट्रोलच्या दराने सेंच्युरी पार केल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलचे दरदेखील सातत्याने वाढत आहेत. गॅसचीही दरवाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे. या दरवाढीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरत मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
मोदी सरकार चले जाव, मोदी सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल, मोदी के पूंजीपती मित्र मालामाल, पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेत. सर्वसामान्य, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना दोनवेळचे जेवण मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा काळातच इंधन, गॅस दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे मोदी सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी.
निदर्शनावेळी माजी महापौर नीलोफर आजरेकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, सुलोचना नायकवडे, संजय पवार-वाईकर, ॲड. गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.