कॉँग्रेसतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:17 AM2019-07-24T11:17:22+5:302019-07-24T11:19:36+5:30
केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, तसेच पिवळ्या रेशनकार्डधारकांना अंत्योदय दिनदयाल उपाध्याय योजनेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी मंगळवारी निवेदन द्यायला गेलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांची भेट न मिळाल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कोल्हापूर : केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, तसेच पिवळ्या रेशनकार्डधारकांना अंत्योदय दिनदयाल उपाध्याय योजनेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी मंगळवारी निवेदन द्यायला गेलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांची भेट न मिळाल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
रेशन कार्डधारकांच्या प्रश्नांवर निवेदन देण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही ते उपस्थित न राहिल्याबद्दल कॉँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी निषेध केला, तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या दारात घोषणाबाजी करत ठिय्या मारला.
निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांचा पारा आणखीन चढला. त्यांनी जोपर्यंत कोणी वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारायला येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. पूर्वकल्पना देऊनही जिल्हा पुरवठा अधिकारी का उपस्थित राहिल्या नाहीत? तसेच त्यांना उपस्थित राहायचे नव्हते, तर पर्यायी अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देणे गरजेचे होते; परंतु त्यांनी तसे केले नाही, हे निषेधार्ह असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलनात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, प्रदेश सचिव संजय पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. काही वेळातच ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना निवेदन सादर करून हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात अनिल कांबळे, तानाजी मोरे, निवास भारमल, मोहन पाटील, अभय मोरे, साईराज पाटील, राहुल उद्गाते, शिवाजी शितळे, स्वाती भोसले, सरस्वती थोरवत, शुभम काटे, सावित्री कदम, रोहन गायकवाड आदींचा सहभाग होता.