पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार
By राजाराम लोंढे | Published: August 26, 2022 08:00 PM2022-08-26T20:00:48+5:302022-08-26T20:01:27+5:30
दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : काहीजण महाभारत घडवणार आहेत, पण आम्ही रामायण घडवणारी मंडळी आहोत. जर महाभारत घडले तर पांडवरुपी जनताच त्यांना उत्तर देईल, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडीक यांच्यावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता. याबाबत विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे आपण व ज्येष्ठ नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. खरे तर, लोकसभा, विधानसभा निवडणूकीला अजून वेळ आहे. त्यावेळी टीकाटिपणी करुया. सत्ता आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणार, हे सांगणे अपेक्षित आहे. आमच्या काळात कोल्हापूर विमानतळासाठी निधी मंजूर केला, मात्र आता तो आला.
कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे, मात्र सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ग्रामीण जनतेशी बोलले पाहिजे. त्यांना विकासाचा विश्वास दिला पाहिजे. बांधकाम परवान्यासह सुविधांबाबत समर्पक उत्तर दिले पाहिजे. यासाठी आपण ग्रामीण जनतेशी बोलूया, असे कृती समितीला यापुर्वीच सांगितल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठांनी राहुल गांधींच्या मागे रहावे
गुलामनबी आझाद हे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सारख्या तरुणांना कॉग्रेसमधील ज्येष्ठांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या मागे राहिले पाहिजे. ४०,५० वर्षे सत्तेच्या माध्यमातून पदे घेतली, आता सगळ्यांनी मिळून पक्ष बळकटीसाठी पुढे आले पाहिजे. असे आमदार पाटील यांनी सांगितले.