कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सतेज पाटील यांच्या विजयाने काँग्रेसला ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 01:38 PM2021-12-02T13:38:00+5:302021-12-02T13:39:00+5:30

पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याने काँग्रेसला ताकद मिळणार आहे. तरीही राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने त्या त्या वेळच्या परिस्थितीवर निर्णय अवलंबून राहणार आहे.

Congress self examination in the kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सतेज पाटील यांच्या विजयाने काँग्रेसला ताकद

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सतेज पाटील यांच्या विजयाने काँग्रेसला ताकद

Next

समीर देशपांडे

कोल्हापूर : पुढच्या वर्षी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविले आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या स्वबळ वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट आहे. अशातच जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याने काँग्रेसला ताकद मिळणार आहे. तरीही राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने त्या त्या वेळच्या परिस्थितीवर निर्णय अवलंबून राहणार आहे.

 पाच आमदार काँग्रेसचे

जिल्ह्यात विधानसभेचे १० आणि विधान परिषदेचा १ आमदार, असे एकूण ११ आमदार आहेत. यामध्ये पाच आमदार काँग्रेसचे आहेत. सतेज पाटील, पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे असे हे पाच आमदार आहेत.

 जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांपैकी सर्वाधिक १५ सदस्य काँग्रेसचे आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर अध्यक्षपद काँग्रेसकडे राहिले आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील हे वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष होते. आता राहुल पाटील अध्यक्षपद भूषवीत आहेत.

 पंचायत समित्यांत काँग्रेसचा प्रभाव कमी

पंचायत समित्यांमध्ये मात्र काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील यांच्यासारखे नेते काँग्रेसपासून दुरावल्याने अनेक ठिकाणी अडचणी आल्या आहेत. करवीरमध्ये सर्वाधिक पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे आहेत. मात्र राधानगरी, गडहिंग्लज, शिरोळ येथे मोजक्या सदस्यांसह काँग्रेस सत्तेत आहे; परंतु १२ पैकी अनेक पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचा सदस्य नाही ही वस्तुस्थिती आहे.

 लोकसभेला जागाच नाही

कोल्हापूर लोकसभेची जागा पहिल्यापासून वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे लोकसभेला काँग्रेसचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणे एवढेच काम आहे.

 लवकरच निवडणुका

येणाऱ्या वर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोल्हापूर महापालिका आणि अन्य नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. विधान परिषदेवर नुकतेच बिनविरोध निवडून गेलेले सतेज पाटील हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सदस्य वाढविण्यावर त्यांचा जाणीवपूर्वक भर राहणार आहे हे निश्चित.

 काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणतात

स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे काही तालुक्यांमध्ये काँग्रेसला मर्यादित यश मिळत आले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन यापुढच्या काळात काँग्रेस मजबूत करण्यावर आपला भर राहणार आहे. - सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस

Web Title: Congress self examination in the kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.