Kolhapur North By Election: कोल्हापूर ‘उत्तर’मधून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी; सत्यजित कदम यांच्यासोबत होणार थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:29 PM2022-03-19T23:29:32+5:302022-03-19T23:30:02+5:30
आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा रिक्त झाली होती.
कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी, माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Chandrakant Jadhav) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिल्लीतून जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यामुळे आता ‘उत्तर’मध्ये जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात सरळ लढत होणार आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा रिक्त झाली होती. जाधव यांच्या शोकसभेवेळीच पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी घोेषणा सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. जयश्री जाधव या २०१५ च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर ‘सम्राटनगर’ प्रभागातून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. नगरसेविका म्हणून त्यांचा कोल्हापूर शहरात संपर्क आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.
क्षीरसागर नॉट रिचेबल -
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल असल्याचे समजते. क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत आहे.
खरे तर, ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढवण्याची तयारी केली होती. यासाठी त्यांनी दोन-तीन मेळावे घेऊन निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे त्यांना थांबावे लागले.
क्षीरसागर समर्थकांची नाराजी -
मैत्रीपूर्ण लढत झाली तर त्याचा राज्याचा राजकारणावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारासोबत राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून क्षीरसागर यांना देण्यात आले होते. यामुळे क्षीरसागर समर्थकांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली. काँग्रेस नेत्यांसह इतरांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शुक्रवारी दुपारीपासूनच ते नॉटरिचेबल असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांतून सांगण्यात आले होते. त्याचबरोबर क्षीरसागर समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली.