कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन ५० दिवस उलटले तरी अद्यापही बँकांसमोरील रांगा कायम आहेत. नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी बाराच्या सुमारास आमदार सतेज पाटील व काँग्रेसचे निरीक्षक रघुजी देसाई, सुधीर ज्ञानजोत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आ. सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.सतेज पाटील म्हणाले, जुन्या नोटा बंदीनंतरच्या ५० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना झळ बसली आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन शिफ्टऐवजी दोन शिफ्टमध्ये या ठिकाणी काम सुरू आहे. या सर्व नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे करून माहिती घ्यावी तसेच कृषी विभागालाही यासंदर्भात सूचना द्याव्यात. या सर्व माहितीचा अहवाल शासनाला सादर करावा. बँक आणि एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवावेत, अशी कॉँग्रेसची मागणी आहे. ज्या कारणांसाठी हा निर्णय घेतला त्यापैकी काहीच घडलेले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, महापालिका सभागृह नेता प्रवीण केसरकर, परिवहन सभापती लाला भोसले, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, शारंगधर देशमुख, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, सरला पाटील, आदी सहभागी झाले होते.मोदींनी जनतेची माफी मागावी५० दिवस संपल्यानंतरही परिस्थिती काही बदललेली नाही. बँकांसमोरील रांगा अजूनही कायम आहेत. हातात रोख चलन नसल्याने सर्व स्तरांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोदींच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जगभर भारताचे हसू झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे निचांकी स्तरावर अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे मोदींनी आपल्या फसलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली आहे.आंदोलकांना अटक व सुटकाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सैनी यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आमदार पाटील यांच्यासह ३५ हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून अलंकार हॉल येथे नेण्यात आले. या ठिकाणी सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली.
काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
By admin | Published: January 07, 2017 1:20 AM