विश्वास पाटील/कोल्हापूर : अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांच्या शिरोळमधील निवासस्थांनी भेट दिली. यावेळी शेट्टी यांनी त्यांचा सत्कार केला. ही भेट घडवून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला होता. आमदार पाटील यांच्या सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोपही खासदार शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात शेट्टी यांची मदत पाटील यांच्या दृष्टीने मोलाची आहे. हा देखील एक पदर या भेटीमागे आहे.
चव्हाण शुक्रवारपासून कोल्हापूर दौ-यावर होते. शनिवारी सकाळी त्यांनी नृसिंहवाडीला जावून दत्त दर्शन घेतले. त्यानंतर ते शिरोळला शेट्टी यांच्या निवासस्थांनी गेले. या भेटीत कर्जमाफी व शेतक-यांच्या प्रश्र्नांवर एकत्रित काम करण्याची तयारी या दोन्ही नेत्यांनी दर्शवली. अन्य राजकीय चर्चा कांही झाली नसली तरी या दोन नेत्यांतील ही भेट अनेकांच्या भुवया उंचावून गेली. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार यावे म्हणून ज्यांनी सगळ्यात जास्त आक्रमक प्रचार केला त्यामध्ये शेट्टी पुढे होते. परंतु सत्ता आल्यावर भाजपाकडून त्यांना सवतीची वागणूक मिळालीच शिवाय राजकीय दृष्ट्या त्यांना संपविण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला.
स्वाभिमानीतून बाजूला झालेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बळ देवून संघटनेचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न पध्दतशीरपणे झाले. या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीतून बाहेर पडली. महाआघाडीतून बाहेर पडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी बसवा असे खासदार शेट्टी जाहीरपणे बोलत आहेत. देशभरातील १८३ शेतकरी संघटनांची मोट बांधून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांनाच आव्हान दिले. त्यासाठी किसान मुक्ती मोर्चा काढला. त्या मोर्चाला गेलेली स्वाभिमानी एक्सप्रेस गुजरातमधून परतीच्या प्रवासात जाऊ नये, असे प्रयत्न पद्धतशीरपणे झाल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे.
भाजपापासून बाजूला गेलेल्या शेट्टी यांनाही राजकारणात भाजपला आडवे करायचे असेल तर कोणतरी भक्कम जोडीदार हवा आहे. शेट्टी यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांची काँग्रेसबाबतची व काँग्रेसची त्यांच्याबाबतची भूमिका कायमच एकमेकांना पूरक राहिली आहे. ऊस आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांत मिलीभगत असल्याचा आरोप करत असे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत हे दोन्ही पक्ष पाच वर्षे सत्तेत होते. आताही शेट्टी यांनी ठरविले तर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता येवू शकते. शेतकरी नेता म्हणून शेट्टी यांच्याबाबत लोकांच्या मनांत आदराची भावना आहे. विधानसभेच्या पाच-पंचवीस मतदार संघात स्वाभिमानीची मते निकालावर परिणाम करणारी आहेत. त्याशिवाय भाजपला घाम फोडणारा शेट्टी यांच्यासारखा स्टार प्रचारक जर हाती लागत असेल तर ते काँग्रेसलाही हवे आहे. त्याची पेरणी करण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्वत:हून शेट्टी यांच्या निवासस्थांनी भेट दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नृसिंहवाडीहून मिरजेला निघाले होते. ते माझे संसदेतील सहकारी आहेत. त्यांच्यासोबतच्या भेटीत कर्जमाफी व शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. - राजू शेट्टी, खासदार व संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना
नवी जुळवाजुळव..!काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळमधील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी शेट्टी यांनी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी भगवान काटे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,सावकर मादनाईक, आमदार सतेज पाटील व गणपतराव पाटील आदी नेते उपस्थित होते.