सातारा : तालुक्यात नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँगे्रस व सातारा विकास आघाडी यांच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या १० व पंचायत समितीच्या २० गणांसाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गट जोरदार भिडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपनेही स्वतंत्र उभे केले आहेत. सातारा व जावळी तालुक्यांत काँगे्रस खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत आघाडी करणार, असे सांगितले जात होते. परंतु सातारा तालुक्यातून काँगे्रसच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांना संधी देऊन उदयनराजेंनी सर्वच गटांत तसेच गणांत आपल्या सातारा विकास आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. शेंद्रे गटामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडून राजू भोसले यांचे नाव अंतिम केल्यानंतर या परिसरातील कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध झाला. येथे गोंधळ होण्याची स्थिती निर्माण झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी पहाटे सुरुचीवर बैठक घेऊन या गटातून राजू भोसले यांचे नाव मागे घेऊन प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे नाव अंतिम केले. डॉ. चव्हाण यांनी सोमवारी दुपारी मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या गटात त्यांचा सामना काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्याशी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. शिक्षण सभापती सतीश चव्हाण व किरण साबळे-पाटील हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भरण्यासाठी धावपळ करत होते. सातारा विकास आघाडीतर्फे सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे ही मंडळी तहसील कार्यालयात ठाण मांडून होती. तर आघाडी प्रमुख खासदार उदयनराजे भोसले हे पोवई नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सर्व आढावा घेऊन गरजेच्या सूचना करत होते. काँगे्रसतर्फे ज्यांनी मुलाखती दिल्या होत्या, त्या अनेकांना डावलले गेले. शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची यामुळे गोची झाली. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँगे्रस कमिटीमध्ये इच्छुक मंडळी येऊन बसली होती; परंतु त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज अपक्ष असेच राहणार, हे स्पष्ट झाले. मुलाखत देऊनही उमेदवारी न मिळाल्याने काँगे्रस कमिटीत जमलेल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाध्यक्षांनी एबी फॉर्म कोणाला दिले आहेत, याची माहिती खुद्द जिल्हा सरचिटणीस धैर्यशील सुपले यांनाही नव्हती. तालुकाध्यक्ष नंदाभाऊ जाधव यांनाच सगळी माहिती असल्याचे त्यांनीही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेंद्रे गटातून प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांना राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडून उमेदवारी मिळाली. डॉ. चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेस उदयनराजेंसोबत.. भाजप स्वतंत्र!
By admin | Published: February 06, 2017 11:32 PM