काँग्रेस, उद्धव ठाकरेंची दलितविरोधी मानसिकता; मिलिंद देवरा यांचा आरोप
By समीर देशपांडे | Published: April 20, 2024 03:22 PM2024-04-20T15:22:55+5:302024-04-20T15:24:53+5:30
'पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये नवीन उद्योग आणतील'
कोल्हापूर : दक्षिण मध्य मुंबईतून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची दलित विरोधी मानसिकता दिसून येते असा आरोप शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे. ते शनिवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.
महायुतीच्या प्रचारासाठी शुक्रवारी देवरा कोल्हापूरमध्ये आले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आर्किटेक्चर बांधवांशी संवाद साधला.
देवरा म्हणाले, ठाकरे गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर त्यांनी दलित उमेदवाराला संधी दिली आहे. महायुतीने या निवडणुकीत आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि ठाकरे यांच्याकडे दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही.
निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे यांची असून त्यांनीच काँग्रेसला कळवले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो. कोल्हापूरच्या युवकांच्या रोजगाराचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये नवीन उद्योग आणतील.