शिरोळ : देशात त्सुनामी आली, असे वातावरण निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले; मात्र कॉँग्रेस पक्षाची एकजूट आजही कायम आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, शिरोळ मतदारसंघातील उमेदवार ताकदवान असेल, असा विश्वास शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व गोव्याचे माजी मुख्यमंत्री खलप शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. येथील समर्थ मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सा. रे. पाटील होते. खलप म्हणाले, शिरोळमधील जनतेने नेहमीच कॉँग्रेसला साथ दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. याचा योग्य अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाईल. सर्वांच्या विश्वासास पात्र असणारा असा उमेदवार दिला जाईल. त्यांच्या पाठीशी आपण राहू.यावेळी गोव्याचे माजी मंत्री देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य दादासो सांगावे, विकास कांबळे, पंचायत समितीचे सदस्य दरगू गावडे, मंगल कांबळे, यशोदा कोळी, विजय पाटील, अमरसिंह निकम, शिरोळच्या सरपंच सुवर्णा कोळी, इकबाल बैरागदार, शेखर पाटील, शोभा कोळी, भालचंद्र कागले, गजानन संकपाळ, शिवाजी माने-देशमुख, के. एस. संकपाळ उपस्थित होते. उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी स्वागत केले. सर्जेराव शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
काँग्रेस ताकदवान उमेदवार देणार
By admin | Published: July 25, 2014 11:47 PM