कोल्हापूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहील, असा विश्वास माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ज्यांची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता असे स्पष्ट केले आहे. येत्या अधिवेशनापूर्वीच हा प्रश्न निकाली लागेल, असे पाटील यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या.काँग्रेसमधील कोणताही नेता भाजपमध्ये जाणार नाही याची मला खात्री आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी पुढील लढाई एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला असून, मविआच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर देऊ. असे सतेज पाटील म्हणाले.आमदार सतेज पाटील म्हणाले, काँग्रेसह मविआच्या प्रमुख नेत्यांची नुकतेच बैठक झाली.राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. सामान्य लोकांचे प्रश्न रखडले असून, बेभरवशाचा पावसामुळे शेतकरी चिंतित आहे. राज्यकर्त्यांचे याकडे लक्ष नसून मविआतर्फे एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले जाईल. खराब रस्ते, नोकरभरती, शिक्षक भरती असे अनेक प्रश्न सुटलेले नसून विरोधी पक्ष म्हणून ते आम्ही ठामपणे मांडू.महाविकास आघाडी एकसंघपणे राहणार असून, आगामी निवडणुकाही एकत्रितपणे लढू. वज्रमूठ सभेबाबत ते म्हणाले, सध्या पक्षीय स्तरावर सभा होत असून, पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर मविआच्या वज्रमूठ सभाही घेतल्या जातील.
..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:11 PM