इचलकरंजी : काँग्रेस भारताचे इस्लामीकरण करू पाहत आहे. देशाला ते आणखी एका विभाजनाकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप करत हे महाराष्ट्र किंवा हिंदुस्थान स्वीकार करेल काय, असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. येथील थोरात चौकात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. इचलकरंजीकरांनी त्यांना चांदीची तलवार आणि श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती भेट म्हणून दिली.योगी म्हणाले, महाराष्ट्राची पावन धर्ती आम्हा सर्वांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या पावन धर्तीवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याच्या अहंकाराचा चक्काचूर केला होता. तेथील किल्ले हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचे प्रतिक आहेत. अयोध्येत राममंदिर बनावे, हे येथील बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते, ते मोदींनी साकार केले. त्यावेळी कॉँग्रेसवाले राम झालेच नाहीत म्हणत होते. आता राम विराजमान झाल्यावर राम सर्वांचेच आहेत, असे म्हणतात. यातून त्यांचा दुग्गलपणा दिसतो.काँग्रेस मुसलमानांना व्यक्तीगत कायदा लागू करण्याची सवलत देणार म्हणतात. अल्पसंख्यांकांना आवडीचे जेवण करण्याची स्वतंत्रता देणार, असे घोषणापत्रात म्हणतात. त्यातून हे गो-हत्येला परवानगी देणार असल्याचे दिसते, हे कोणीही मान्य करणार नाही. यापूर्वीही कॉँग्रेस सरकारने जस्टीस रंगनाथन यांची समिती नेमून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील ६ टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या म्हणत होते. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी लागू केलेल्या संविधानात धर्मावर आधारीत आरक्षणाला विरोध केला होता. त्यानुसार एनडीएने या मागणीचा विरोध केला. त्यानंतर कॉँग्रेसने दुसरी समिती स्थापन करून मुस्लिमांमधील काही जातींचा दलितमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, तोही एनडीएने हाणून पाडला. काँग्रेसने नेहमीच देशाची परंपरा अपमानित होईल व बदनामी होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. मोदींनी डॉ. आंबेडकर यांच्या वंचित स्थळांचा तीर्थात निर्माण केला. देशातीलच नाही, तर जगातील ज्या-त्याठिकाणी बाबासाहेबांच्यासोबत जोडलेले स्थळ होते, त्याला तीर्थाचे स्वरुप देण्याचे काम केले. कॉँग्रेसने ६० वर्षांच्या काळात भ्रष्टाचार, आतंकवाद, कमिशन खोरी यातून देश भरभटला, तर मोदींनी आत्मनिर्भर भारत बनवत देशाचा आत्मसन्मान वाढवला, अशा नव्या भारताच्या उद्यासाठी त्यांचे हात बळकट करा, त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. उमेदवार धैर्यशील माने यांनी, ही लढाई धर्माची अधर्म अशी आहे. सत्याची असत्याशी आहे. देशाल बळकट करणारी आहे, त्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन केले.सुरूवातीला अनिल डाळ्या, ऋषभ जैन, मिश्रीलाल जाजू, विठ्ठल चोपडे, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, सदाभाऊ खोत, मंत्री उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदींची भाषणे झाली. यावेळी महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
..तर पुन्हा निवडणूक लढणार नाही : मानेशहराचा पाणीप्रश्न या निवडणुकीतही गाजत असल्याने उमेदवार धैर्यशील माने यांनी, पुढील पाच वर्षात या शहराला पाणी दिलो नाही, तर त्यापुढील कोणतीच निवडणूक मी लढणार नाही, असे जाहीर केले.