कोल्हापूर : प्रेम नसल्याने ईर्षा निर्माण होते. ईर्ष्येतून द्वेष, द्वेषामधून तिस्कार, तिरस्कारातून अपमान आणि अपमानातून अपेक्षा वाढून अखेरीस दु:ख वाटणीला येते. मग यातून कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्ध्वस्त होते. ते टाळण्यासाठी एकमेकांना जोडण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. ते प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून करा, असे आवाहन राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांनी मंगळवारी येथे केले.येथील सूर्योदय परिवारातर्फे धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवचन व दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रसंत भैयूजी महाराज म्हणाले, जीवनात प्रत्येकाची एकसारखी परिस्थिती राहत नाही. चढ-उतार, यश-अपयश, अपमान-सन्मान, पाप-पुण्य हे सुख-दु:खाचे प्रकार आहेत. काळ, वेळेप्रमाणे प्रत्येक परिस्थिती बदलते. जीवनात चांगली-वाईट परिस्थिती येते-जाते. कशीही परिस्थिती आपल्यासमोर आली तरी संयमाने वर्तन केले पाहिजे. संयम सोडला तर तुम्ही संपला. संयम असणारे लोक जीवनात यशस्वी होतात. जीवनाचा आनंद लुटतात. प्रेम नाही तेथे कलह आहे. कुटुंबात प्रेम वाढवा. कुटुंब एकत्र राहिल्यास समाज तयार होईल. समाजातून एकसंघ राष्ट्र घडते. कुटुंब, समाज आणि राष्ट्र वाचविण्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. आपण भौतिक सुख मिळविले असून, माधुर्याचे सुख मिळविलेले नाही. सुख, संपत्तीबाबतच्या भीतीपाठोपाठ आता अज्ञात भय निर्माण झाले आहे. या भयाचे कारण समजत नसल्याने माणूस तणावाखाली राहतो. तणावापासून दूर जायचे असल्यास, सुखात जगायचे असल्यास प्रेम महत्त्वाचे आहे. यावेळी संजीवनीदेवी गायकवाड, धैर्यशील नलवडे, माणिक पाटील-चुयेकर, प्रसाद कांबळे, संजय बटकडली, संग्रामसिंह नलवडे, पी. डी. पवार, गौरी इंगळे आदी उपस्थित होते. बापूसाहेब भोसले यांनी प्रास्ताविक केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. प्रवचनानंतर भैयूजी महाराज यांच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्णांतील साधकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
आपुलकीने एकमेकांना जोडा
By admin | Published: March 02, 2016 12:59 AM