कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात केले. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करा, असेही आवाहन त्यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या ७३ व्या निरंकारी समागमात त्या बोलत होत्या. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टीव्ही चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ जगभरातील भक्तगणांनी घेतला.
सुदीक्षाजी म्हणाल्या, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आणि शाश्वत आहे. त्याच्याशी नाते जोडल्यावर मनात स्थैर्य येते. विवेकपूर्ण निर्णयाची क्षमता वाढते. जीवनातील चढउताराचा सामना सहजपणे करू शकतो. आपला पाया परमात्म्याशी जोडला असेल, त्याच्याशी एकरूप झाला असेल तर परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार तुम्हाला विचलित करू शकत नाहीत. जगात उलथापालथ होतच राहणार, परिस्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असेल; पण निराश न होता चढउतारामध्ये समतोल ठेवून चालल्याने जीवनात स्थिरता निर्माण होते.
समागमाच्या या कार्यक्रमात झालेल्या सेवा दल रॅलीत कवायत, प्रार्थना, खेळ, लघुनाटिकांतून मानवतेचा संदेश दिला गेला. बहुभाषिक कविसंमेलनही झाले. याशिवाय सुमधुर गायन, पुरातन संताची भजने, अभंगवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
फोटो: १०१२२०२०-कोल-निरंकारी