भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर--ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे कनेक्शन संकेश्वर (कर्नाटक)मार्गे आजरा येथे असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी सांगलीतून अटक केलेल्या संशयित समीर गायकवाडचा गोतावळा संकेश्वर आणि आजरा येथे आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील साध्या वेशातील पोलीस संकेश्वरात पहाटेपासून तळ ठोकून होते. त्याच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली जात आहे. कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर कर्नाटक पोलीस मारेकऱ्यांच्या शोधात आहेत. पानसरेंचा संशयित सापडल्याने कर्नाटक पोलिसांचे तपासाचे केंद्रही संकेश्वरच बनले आहे. समीरची आई शांता यांचे माहेर संकेश्वरातील जाधव कुटुंबातील आहे. संकेश्वरातील गांधी चौकात त्यांचे वडिलोपार्जित सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. आकाशवाणी केंद्रात नोकरी लागल्यानंतर वडील विष्णू सांगलीत स्थायिक झाले. समीरला सचिन व संदीप असे दोन भाऊ आहेत. समीर हा सर्वांत लहान आणि भांडखोर स्वभावाचा होता. त्यामुळे त्याला शिक्षणासाठी संकेश्वरात मामाकडे ठेवण्यात आले. त्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संकेश्वरातच पूर्ण केले. त्याच्या दोन मावशा व मामा सनातन संस्थेचे कट्टर प्रचारक आहेत. त्यामुळे समीरला ‘सनातन’चे बाळकडू आजोळीच मिळाले. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मामाच्या सायकल दुकानाशेजारीच छोटेसे इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचे दुकान त्याने सुरू केले. तेथेही जम बसला नाही; त्यामुळे त्याने सांगली गाठली.दरम्यान, समीरचे दोन मामा १९९६ च्या सुमारास आजरा येथे गेले. तेथे एका मामाने सुरुवातीला काही दिवस एका पोलिसाच्या मदतीने खासगी सावकारी केली. मात्र, पोलीस आणि त्याच्यात काही कारणामुळे बिनसले. त्यामुळे खासगी सावकारी बंद करून मामाने आजऱ्यातील शिवाजीनगरात नबापूर भागात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले.आजऱ्याला आलेल्या दुसऱ्या मामाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. जवळचा गोतावळा असल्यामुळे संकेश्वर आणि आजरा येथे समीरचे नेहमी येणे-जाणे होते. तीन वर्षांपूर्वी आजरा येथील मामाच्या डॉक्टर मुलीशी समीरचे लग्न झाले. मात्र, दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे पत्नी गोवा येथे राहते, तर समीर सांगली येथे राहत होता. आजऱ्यातील समीरचा मामाही सनातन संस्थेचा कट्टर, सक्रिय कार्यकर्ता होता. जहाल हिंदुत्ववादी लोकांच्या ग्रुपमध्ये तो राहतो. ‘सनातन’च्या मुखपत्र वितरणाची जबाबदारी तो अनेक वर्षांपासून पार पडतो. अशा प्रकारे समीरचे बहुतेक नातेवाइक सनातन संस्थेशी संबंधित आहेत. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर संकेश्वर आणि आजरा येथे खळबळ उडाली. आजरा येथील सायकलचे दुकान असलेला त्याचा मामा पसार झाला असून, आजूबाजूचे लोक मात्र तो गणपतीला संकेश्वरला गेल्याचे सांगत आहेत.हत्येनंतरही वावरअॅड. पानसरे यांच्या हत्येनंतरही समीर अनेकवेळा संकेश्वर व आजरा येथे येऊन गेल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वरात अनेक वर्षांपासून सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये समीर, त्याच्या दोन मावशा, मामा असायचे. एक मावशी गोवा आणि दुसरी मिरज येथील ‘सनातन’च्या गोटात अधिक सक्रिय होती.
हत्येचे कनेक्शन संकेश्वरमार्गे आजरा?
By admin | Published: September 18, 2015 12:52 AM