कोल्हापूर : दहा वर्षांनंतर झालेली प्रभाग रचना व आरक्षणामुळे शहरातील काही प्रभागांत ‘कहीं खुशी, कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभाग आरक्षणामुळे काही नगरसेवकांना विश्रांती, तर काही नगरसेवक, नगरसेविका दुसऱ्या प्रभागात नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच २०१० च्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मते मिळालेल्या उमेदवारांनी आपल्या पक्षातून, आघाडीमधून यंदाची निवडणूक आपल्याकडून लढवावी, यासाठी कारभाऱ्यांनी जोडण्या सुरू केल्या. इच्छुकांना साकडे घालण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.महापालिकेची २००५ मध्ये प्रभाग रचना झाली. त्यावेळी ७७ नगरसेवक व पाच स्वीकृत, असे ८२ नगरसेवक होते. त्यानंतर आता दहा वर्षांनी प्रभाग पुनर्रचनेत ८१ नगरसेवक होणार आहेत. २०१० मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर मते मिळविलेल्या उमेदवारांशी पक्ष व आघाडीच्या कारभाऱ्यांनी गाठी-भेटी सुरू केल्या. मात्र, आरक्षणाचा फटका उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. ज्या प्रभागात आपले हक्काचे ६० टक्के मतदान राहिले आहे, त्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार नशीब अजमावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विद्यमान नगरसेवकांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांच्या पत्नी, आई यांना उभे करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावरून निवडणूक ईर्ष्येची होणार हे दिसते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कारभाऱ्यांनी जोडण्या सुरू केल्या. ताराराणी आघाडीची सूत्रे तीन माजी नगरसेवक, तर जनसुराज्य पक्षाची सूत्रे एक स्वीकृत नगरसेवक हाताळत आहेत. राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनीही चाचपणी केली. काँग्रेसमधील एका गटाचे कारभारी म्हणून एका साखर कारखान्याचे माजी संचालक, तर त्या भागातील ‘वजनदार’ व्यक्ती कारभारी म्हणून काम पाहत आहेत.प्रभाग रचना, आरक्षणाबाबत आजपासून हरकतीमहापालिकेसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती व सूचना आज, सोमवारपासून घेण्यात येणार आहेत. हरकती व सूचना ताराराणी गार्डनमध्ये असलेल्या मुख्य निवडणूक कार्यालयासह चार प्रभाग विभागीय कार्यालयांमध्ये दहा आॅगस्टपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत सादर करावयाच्या आहेत.दोन दिवसांपूर्वी आॅक्टोबर २०१५ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग व आरक्षण जाहीर केले. या प्रभाग व आरक्षणाबाबत आज, सोमवारपासून यावर हरकती व सूचना घेण्यात येणार आहे. या हरकती शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट, गांधी मैदान या विभागीय कार्यालयांसह ताराबाई पार्कातील ताराराणी गार्डनमध्ये असलेल्या मुख्य निवडणूक कार्यालयात घेण्यात येणार आहेत. प्रभाग रचनेची भौगोलिक स्थिती याबाबत हरकती घेण्यात येणार आहेत. या प्रभाग रचनेत एखाद्याची जागा अथवा एकच घर दुसऱ्या प्रभागात येत असेल अशा स्वरूपाच्या तक्रारी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, हरकती व सूचनांचे विवरणपत्र १३ आॅगस्टला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.५राष्ट्रवादीची चाचपणी; आज मुश्रीफ-कोरे बैठककोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने रविवारी शहरातील ८१ प्रभागांची चाचपणी केली. ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत हसन मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांची बैठक आज, सोमवारी कोल्हापुरात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी आघाडीतील घटकपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने वारणानगर (ता. पन्हाळा) येथे माजी मंत्री विनय कोरे यांनी प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांची रविवारी रात्री बैठक घेतली.राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्ष या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या बैठकीत मुश्रीफ यांनी शहरातील ८१ प्रभागांत काय स्थिती आहे? त्याठिकाणी कोणता उमेदवार द्यावयाचा? याची माहिती घेतली. यावेळी काही नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी मते व्यक्त केली.
कारभाऱ्यांच्या जोडण्या गतिमान
By admin | Published: August 03, 2015 12:35 AM