इचलकरंजी : ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रक मोटारमालक संघटना व व्यापारी यांनी समन्वयातून मार्ग काढावा. नियमानुसार गाठीचे वजन ५० किलो असावे. लहान रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने लावू नयेत. यामध्ये कोणत्याहीप्रकारचा वाद होणार नाही, याची काळजी घेऊन निर्णय घ्यावा, असे सोमवारी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
आमदार प्रकाश आवाडे व प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नियमबाह्य कापड व सुताच्या गाठी अधिक उंचीने वाहनात भरल्या जात आहेत. त्यामुळे धोकादायक वाहतूक तसेच उंचीमुळे विद्युत तारा तुटणे, असे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी लहान रस्त्यावर दिवसभर माल भरणे-उतरण्यासाठी मोठे ट्रक लावले जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. अन्य व्यावसायिकांना त्रास होतो. मुख्य मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहराबाहेर लहान वाहनात माल भरून तो शहरामध्ये पुरवावा. तसेच तयार झालेला मालही लहान वाहनातून शहराच्या बाहेर नेऊन ट्रकमध्ये भरावा. नियमबाह्य माल भरू नये, अशी विविध मते उपस्थितांनी मांडली. अखेर आरटीओ नियमानुसारच गाठीचे वजन, नियमानुसार उंची व माल भरावा, यावर संमती दर्शविण्यात आली. बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे नंदकुमार मोरे, माथाडी निरीक्षक शामराव पुरीबुवा, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गागरे, टेम्पो मालक असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.