कसबा बावडा : मार्च एंडिंगमुळे सध्या सर्वच बॅँकांची कर्जवसुलीसाठी धांदल उडाली आहे. नुकत्याच पंजाब नॅशनल बॅँकेपाठोपाठ अन्य इतर राष्टÑीयीकृत (सरकारी) बॅँकांतील गैरव्यवहार ऐन मार्च एंडिंगच्या तोंडावर उघड होऊ लागल्याने त्याचा परिणाम आता कर्जवसुलीवर होऊ लागला आहे. ‘आधी मोठ्यांची कर्जे वसूल करा व मग आमच्या दारात या’ अशी शेरेबाजी होऊ लागल्याने शाखाधिकाºयांची शुगर व बी.पी. वाढू लागली आहे.
जानेवारीत कोल्हापुरातील राष्टÑीयीकृत बॅँकांची थकबाकी सुमारे दीड हजार कोटींच्या घरात होती. मार्च एंडिंग जवळ आल्याने या थकबाकीमध्ये काही प्रमाणात घट अपेक्षित होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात पंजाब नॅशनल बॅँकेत ११ हजार ३६० कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्याचबरोबर इतर बॅँकांतील गैरव्यवहार उघडकीस आल्याने प्रामाणिक कर्जाचे हप्ते भरणाºया कर्जदारांच्या मनात या प्रकाराबद्दल प्रचंड नाराजी व बॅँकांवर रोष आहे. त्याचा परिणाम सध्या कर्जवसुलीवर होताना दिसत आहे.
जेव्हा बॅँकांचे शाखाधिकारी, क्लार्क व शिपाई कर्जदाराच्या दारात जातात तेव्हा कर्जदारच उलटा प्रश्न विचारत आहेत. कोट्यवधींचे कर्ज बुडवून बाहेर पळून गेलेल्यांचे काय केले? त्याची आधी कर्जे भरून घ्या आणि मग आमच्या दारात या, अशी तंबी बॅँक कर्मचाºयांना आता काही ठिकाणी होत आहे. यावर बॅँक कर्मचारी निरुत्तर होत आहेत. अहो ते कर्ज आमच्या बॅँकेने दिलेले नाही असे जरी मॅनेजरनी सांगण्याचा प्रयत्न केला तरी सगळ्या बॅँका सारख्याच, अशी टिप्पणीही आता कर्जदारांकडून होताना दिसत आहे. सध्या अनेक बॅँकांचे शाखाधिकारी हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.
यापैकी अनेकांना बी.पी. व शुगरचा त्रास आहे. मुख्यालयाकडून अपेक्षित थकबाकी कमी करण्याचे टार्गेट आहे. कर्जदार तर वसुलीसाठी दारात आलेल्या बॅँक कर्मचाºयांना वाट्टेल तसे बोलत आहेत. या सर्वांचा परिणाम काही बॅँक अधिकाºयांचा तसेच कर्मचाºयांचा बी. पी. व शुगर वाढण्यावर होत आहे. औषधे खाऊन सध्या ते मार्च एंडिंगची कामे करीत आहेत. एका बॅँक अधिकाºयाने आता बॅँकेत काम करण्यासाठी पूर्वीसारखे दिवस उरले नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, काही राष्टÑीयीकृत बॅँकांनी ठेवीच्या व्याजदरात अर्धा ते पाऊन टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ठेवीदरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होऊ शकतो. मार्च एंडिंगपर्यंत काही बॅँका ठेवींच्या दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.