कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि कोकणासह देश माथ्यावरील पायवाटा, त्यांची आजची स्थिती याचा अभ्यास करून ते संरक्षित करावेत, याचा अंतर्भाव करून सर्वांगीण मास्टर प्लॅन तयार करावा, असा सूर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुर्गप्रेमींकडून दुर्ग संवर्धनाबाबत सूचना मागवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली. करवीरनगरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पन्हाळगडास सिद्धी जोहराने वेढा टाकला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी या वेढ्यातून सुटका केली होती. यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावली. पावनखिंडीत खिंड लढविली. यासह प्रतापराव गुर्जर समाधी व धारातीर्थी पतन हेही महत्त्वाचे आहे. स्वराज्याच्या दक्षिणेतील पारगड येथे मालुसरेंचे वंशज राहतात, तर उत्तरेकडील विशाळगड देश कोकणापर्यंत जोडला आहे. दुर्ग श्रृंखला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांना जोडणाऱ्या प्राचीन घाट वाटा आहेत. त्याकाळी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजमार्गच होते. त्यामुळे गडकिल्ल्यांसोबत घेराभोवतालचा विकासही आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. जल स्वयंपूर्णता दुर्गांकडून
संपूर्ण राज्यातील किल्ल्यावर जलस्रोत आहेत. त्यांची डागडुजी, स्वच्छता केल्यानंतर त्यातील गडाच्या पायथ्याची एक किंवा दोन गावातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. याचाही विचार संवर्धनात आवश्यक आहे.
जिल्ह्यात तेरा किल्ले
ऐतिहासिक पन्हाळगड, विशाळगड, पावनगड, मुडागड, गगनगड, रांगणा ऊर्फ प्रसिद्धीगड, भुदरगड, शिवगड, गंधर्वगड, महिपालगड, पारगड, कलानिधीगड, सामानगड, अशा तेरा किल्ल्यांचा समावेश आहे.
कोट
सर्व गडकिल्ले संरक्षित करणे गरजेचे आहे. त्या किल्ल्यांची देखभाल करण्याची जबाबदारी निश्चिती करणे, ज्या स्थितीत हे किल्ले आहेत त्याचा अभ्यास करणे, त्याचे डाॅक्युमेंटेशन करणे, किल्ल्याभोवतालच्या पायवाटा, वनसंपदा, दगड, स्थापत्य नमुना, जलस्रोत, लोकसंस्कृती आदींचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांची डागडुजी आजच्या सिमेंट सळीसारख्या आधुनिक साहित्याने नको. ती त्यावेळी वापरण्यात आलेल्या साहित्यानेच करावी.
- डाॅ. अमर अडके, अध्यक्ष, कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशन.