कोल्हापूर : राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना करीत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. मेन राजाराम हायस्कूल येथे त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते. खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांचे संवर्धन करायचे आहे. त्याकरिता एक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातील संबंधितांशी बोलणे झाले आहे. हे काम मोठे आहे. त्याकरिता दुर्ग संवर्धन करणाऱ्या राज्यातील २२७ हून अधिक संघटनांना एकत्रित करण्यासाठी दुर्ग फेडरेशनची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या या विभागाशी सामंजस्य करार करून हे काम केले जाणार आहे. यात राज्य शासनाच्या सांस्कृतिक, पर्यटन, वन आदी विभागांशी समन्वय साधून ही फेडरेशन काम करेल. त्याचे सदस्यत्व राज्यातील गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या २२७ संस्थांना देत आहोत. हे काम करीत असताना एकाच छताखाली या संस्था येणे गरजेचे होते. यानिमित्त लवकर रायगड प्राधिकरणाच्या सदस्यांचीही बैठक घेतली जाईल. वाढदिवसानिमित्त राज्यातील २२७ संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित आले, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संरक्षण कसे होईल, याकरिता ही मंडळी एकत्रित येऊन विचारविनिमय करीत आहेत.
तत्पूर्वी इतिहासकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, गडकिल्ले अभ्यासक सर्जेराव भामरे, वरुण भामरे, राम खुर्दळ, राम यादव, सचिन पाटील यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. ठराव वाचन राम यादव व सुखदेव गिरी यांनी केले. धनंजय जाधव यांनी आभार मानले.
चौकट
सी फोर्ट सर्किट
राज्याची राजधानी मुंबई व शिवराज्याची राजधानी रायगड जोडण्यासाठी समुद्रमार्गे पर्यटन सुरू करावे. याकरिता सी फोर्ट सर्किट ही नवी संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मांडली आहे. यात पद्मदुर्गा, मुरुड, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आदी जेट्यांची येत्या १५ दिवसांत परवानगी घेतली जाणार आहे.
ठराव असे,
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासह रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल खासदार संभाजीराजे यांचा अभिनंदन केले.
- राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा.
- राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठांमध्ये गडकिल्ल्यांच्या सवर्धन, जतन याविषयी अभ्यासक्रम सुरू करावा.
-ज्या गडकिल्ल्यांची नोंद पुरातत्त्व खात्याकडे नाही, त्यांची नोंद राज्य पुरातत्त्व खात्याने करावी.
- वासोट्या किल्ल्यांच्या धर्तीवर सर्वच किल्ल्यांवर प्लास्टिक बंदी करा.
- दुर्ग संवर्धनाच्या कामाकरिता सर्वच संस्थांना खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित काम करण्यासाठी संस्था उभारावी.
- छत्रपती राजाराम महाराजांची आठवण असणाऱ्या मेन राजाराम हायस्कूल इमारतीचे संवर्धन करावे.
फोटो : ११०२२०२१-कोल-दुर्गपरिषद
ओळी : कोल्हापुरातील जुना राजवाडा परिसरातील मेन राजाराम हायस्कूलमध्ये गुरुवारी झालेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत खासदार संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष हसूरकर, गिरीश जाधव, संयोगिताराजे, डाॅ. सर्जेराव भामरे उपस्थित होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)