कोल्हापूर : सर्व प्रकारच्या उद्योगांना वीजदरात कपात करून दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. दर कपातीबाबत पर्याय देण्याचा विचार करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत दिले. कोणत्या पद्धतीने आणि किती दरकपात करायची यावरील पर्यायांचा विचार करून, महिन्याभरात अहवाल द्यावा, असे आदेश त्यांनी ऊर्जा सचिव अरविंद कुमार यांना दिले.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळासमवेत बुधवारी (दि. ६) मुंबईत पालकमंत्री पाटील यांनी चर्चा केली. चार दिवसांपूर्वी पणजी (गोवा) येथे झालेल्या औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरातील फौंड्रीच्या वीजदरात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्यावर कोल्हापुरातील औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींनी सर्व उद्योगांच्या वीजदरात कपात व्हावी, असा आग्रह धरला.
त्याबाबत पालकमंत्री पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांची बैठक झाली; त्यासाठी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, ‘मॅक’चे उपाध्यक्ष गोरख माळी, उत्कर्ष औद्योगिक संस्थेचे गणेश भांबे, लक्ष्मी औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष शीतल केटकाळे, आदी उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील फौंड्रीसाठी वीजदर कपात करण्यासाठी सरकार तयार आहे. हा निर्णय तातडीने होऊ शकतो. उद्योजकांकडून वसुल केली जाणारी क्रॉस सबसिडी, पॉवर फॅक्टर पेनल्टी, आदी बाबींचा विचार करून, कोणत्या पद्धतीने उद्योजकांना दिलासा देता येईल, याचा विचार सुरू असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
सचिव स्तरावर काम सुरू राहीलउद्योजकांच्या शिष्टमंडळाने वीज दरवाढीमुळे निर्माण झालेल्या समस्या बैठकीत मांडल्या. दरवाढीमुळे सरासरी प्रतियुनिट एक ते दीड रुपयांची वाढ झाली आहे. त्यातील किमान दीड रुपयांची कपात व्हावी किंवा तितके अनुदान सरकारने द्यावे, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली. त्यावर आचारसंहिता सुरू केली, तरी सचिव स्तरावर काम सुरू राहील, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.