राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले नसल्यामुळे काहीसा दिलासा कोल्हापूर शहरवासीयांना मिळाला आहे. राधानगरी धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. त्याच्या स्वयंचलित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला असता तर कोल्हापूर व परिसरातील पूरस्थिती आणखी बिकट झाली असती. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणी नियंत्रित करण्यासाठी केलेले नियोजन पथ्यावर पडले आहे. यापूर्वीचा हा अनुभव असल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी पावसाळ्याआधीच योग्य नियोजन केले. मेअखेर धरणात अडीच टीएमसी पाणी होते. त्यामुळे जूनपासूनच या पाण्याचा विसर्ग सुरू केला. यावर्षी पाऊस लांबला मात्र, 15 ते 20 जूनदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी वाढले. या काळात जवळपास 5 टीएमसीहून जास्त पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग झाला नसता, तर आठ दिवसांपूर्वीच धरण भरले असते व पूरकाळातच मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असता.
ठळक-
कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचा अनुभव जमेस धरून धरणातील पाण्याचा विसर्ग अगोदर सुरू केला. यामुळे धरण भरण्याचा कालावधी वाढला. मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसाचे पाणी धरणात अडल्याने पूर नियंत्रित राहण्यास मदत झाली. विवेक सुतार, शाखा अभियंता राधानगरी पाटबंधारे विभाग.