कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व माल ट्रक वाहतुकदार व संघटनांचे प्रतिनिधी यांनी ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून हमाली न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’, ‘ज्याचा माल त्याचा विमा’ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसात ट्रक वाहतुकदार यामध्ये सहभागी झाले होते.दुपारी बाराच्या सुमारास शाहुपुरी येथील असोसिएशनच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. भरपावसात घोषणाबाजी करत ट्रक वाहतुकदारांचा मोर्चा प्रमुख मार्गावरुन बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हंटले आहे की,डिझेल, विमा, टोल, हमाली, रस्ते कर यामध्ये झालेली भरमसाठ वाढीमुळे एका खेपेला मिळणारे वाहतुक भाडे व होणारा खेपेचा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. माल ट्रक वाहतुक व्यवसाय परवडत नाही. म्हणून जिल्ह्यातील असंख्य ट्रकधारकांनी आपले ट्रक बंद ठेवले आहे. परंतु त्यांच्या वाहनांवर बॅँकांची व फायनान्स कंपनीची कर्जे आहेत. त्याची वेळेत व्याजासह परतफेड करु शकत नाही. त्याच्या वसुलीकरीता बॅँका व फायनान्स कंपन्यांनी तगादा लावला आहे. आर्थिक अडचणींमुळे व कर्जामुळे काहींनी आत्महत्या केल्या आहेत.आंदोलनात अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले,प्रकाश केसरकर, बाबला फर्नांडीस, पंडीत कोरगावकर आदी सहभागी झाले होते.